स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन अन् उद्बोधक विचार मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात व आदर्शाच्या ठिकाणी पोहोचवतात. जीवनात उच्च आदर्शाची स्थापना व त्यासाठी मनाची जडण-घडण ही लहान वयातच व्हावी लागते. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार उपयुक्त असून, पाल्यांना हे विचार लहान वयातच समजले पाहिजेत. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक व तेजस्वी विचार आचरणात आणल्यास आपले भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल होईल. असा ठाम विश्वास येथील जनकल्याण पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनंत जोशी यांनी व्यक्त केला.
जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिरामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीवर्षांचे औचित्य साधून शिक्षक-पालक संघातर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि पालक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांत चव्हाण, डॉ. प्रकाश सप्रे, मुख्याध्यापक राजेंद्र आलोणे ज्योती कुलकर्णी, मोहन वैद्य, मोहन सर्वगोड, गीतांजली तासे, शरयू माटे, विद्या घोलप यांची उपस्थिती होती.
अनंत जोशी म्हणाले, की स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श जीवनातून व प्रेरक विचारातून प्रेरणा घेतल्यास सर्वाचेच जीवन सार्थक होईल. स्वामी विवेकानंदांनी मानव जातीच्या कल्याणासाठी विश्वबंधुत्वाचा संदेश जगभर पसरवला, हीच भावना आपल्यात निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार प्रेरक असून ते विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत. प्रास्ताविकात राजेंद्र आलोणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी शाळेकडून ५० उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात स्वामी विवेकानंद या विषयावर पालकांची प्रश्नावली स्पर्धाही घेण्यात आली. तसेच पालकसंघ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत डॉ. प्रकाश सप्रे यांनी केले. मिलिंद उमराणी यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Story img Loader