महापालिकेच्या वाचनालयातून यशाचा झेंडा फडकला
यश मिळवण्यासाठी साधनांच्या अभावाचे कारण पुढे करून रडगाणे गाणाऱ्यांच्या जमान्यात उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने वापर करणारे वेगळे ठरतात. अमरावतीच्या एका तरुणाने अमरावती महापालिकेच्या ग्रंथालयातून मार्गदर्शन घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदापर्यंत झेप घेतली आहे. स्वप्नील तांगडे या विद्यार्थ्यांने एमपीएससीच्या परीक्षेत राज्यातून सातवा क्रमांक मिळवून या ग्रंथालयालाही चर्चेत आणले आहे.
अमरावती महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाची स्थापना १ मे २०११ रोजी झाली असून राज्यातील अशा प्रकारचे हे दुसरे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. चोवीसही तास विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या ग्रंथालयाचा उपयोग घेऊन आतापर्यंत सुमारे ७१ विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक, लिपिक, तलाठी, मंत्रालयीन सहायक, अशा अनेक पदांपर्यंत शासकीय सेवांमध्ये नियुक्ती मिळवली आहे. सोबतच स्वप्नील तांगडे या विद्यार्थ्यांचे यश लक्षवेधी ठरले आहे. अनेक व्यावसायिक आणि महागडय़ा शिकवणी वर्गामधून मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा स्वप्नीलचे हे यश आगळे ठरले आहे. ग्रंथालयातील पुस्तकांची संपदा आणि सुविधांमुळेच आपल्याला परीक्षेत यश मिळू शकले, असे स्वप्नील तांगडे म्हणाला.
येथील कॅम्प परिसरात महापालिकेने हे गं्रथालय उभारले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महापालिकेच्या वतीने चालवले जाणारे हे विदर्भातील एकमेव ग्रंथालय ठरले आहे. राज्यात ठाणे येथे विद्यार्थ्यांसाठी असे गं्रथालय याआधी उभारण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी नुकतीच गं्रथालयाला भेट देऊन येत्या काळात या परिसरात इंटरनेट, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. या वाचनालयात प्रवेश घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यावरूनच या ग्रंथालयाची उपयोगिता स्पष्ट होते. या गं्रथालयाचे नाव मोठे करण्यात येथील विद्यार्थ्यांचाच हातभार लागणार असून इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. यापुढे विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे सांगून त्यांनी स्वप्नील तांगडे याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. या ग्रंथालयाची जबाबदारी सांभाळणारे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांचेही आयुक्तांनी कौतूक केले. महापौर वंदना कंगाले, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, स्थायी समिती सभापती सुगनचंद गुप्ता यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वप्नीलचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा