हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील आघाडीचे ख्यातकीर्त कलाकार गायक उस्ताद राशीद खान, शंकर महादेवन, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंदी, संतूरवादक राहुल शर्मा, बासरीवादक रोणू मुझुमदार, खंजीरा विद्धवान सेल्वा गणेशन, व्हायोलिनवादक कुमारेश व आदित्य कल्याणपूर आदी दिग्गजांना एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. ‘स्वरांजली’ या महोत्सवाच्या माध्यमातून हे सर्व दिग्गज एकत्र येणार असून ८ ते १० जानेवारी असे तीन दिवस वरळी येथील नेहरू केंद्रात सायंकाळी ६.३० वाजता रंगणाऱ्या महोत्सवात या दिग्गजांच्या संगीताच्या मैफलीचा आस्वाद मुंबईकरांना घेता येणार आहे.
‘स्वरप्रभा ट्रस्ट’ने आयोजित आणि बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, एस्टार्क, बँक ऑफ इंडिया, बिर्ला व्हाइट सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी कंपन्यांनी प्रायोजित या महोत्सवाची सुरुवात प्रख्यात गायक जयतीर्थ मेवुंदी यांच्या गायनाने होणार आहे, तर पहिल्या दिवसाची सांगता पंडित रोणू मुझुमदार (बासरी) आणि विद्वान सेल्वा गणेशन (खंजीरा), विद्वान कुमारेश (व्हायोलिन) आणि आदित्य कल्याणपूर (तबला) यांच्या जुगलबंदीने होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राहुल शर्मा यांच्या संतूरवादनाने होणार असून दिवसाची सांगता राशीद खान यांच्या गायनाने होईल. महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीला पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा आस्वाद मुंबईकरांना घेता येईल, तर बहुआयामी गायक शंकर महादेवन यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.गेल्या १३ वर्षांपासून ‘स्वरप्रभा ट्रस्ट’तर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. कै. पंडित सुरेश हळदणकर, कै. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि कै. पंडित सी.आर. व्यास या आपल्या गुरूंना स्वरांच्या माध्यमातून आदरांजली म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ‘स्वरप्रभा ट्रस्ट’चे पं. प्रभाकर कारेकर यांनी सांगितले.  महोत्सवाविषयीच्या अधिक माहितीसाठी रिदम हाऊस- ४३२२२७२७ आणि नेहरू केंद्र – २४९६४६८० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा