ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विविध महसुली प्रकरणे निकाली काढणे, सातबारावरून मृतकांच्या नोंदी कमी करून वारसांच्या नावाची नोंद करणे, सातबाऱ्याचे चावडी वाचन आणि अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करणे, अशा विविध प्रकरणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २०१३-१४ या वर्षांत सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवण्यासाठी आता शासन कलापथकाचा आधार घेत आहे.
या योजनेअंतर्गत विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलापथक चमूसोबत करार केल्या जात आहे. त्या मोबदल्यात कलापथकाला आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. हे कलापथक गावोगावी फिरून शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना देतील. या अभियानाचे नेतृत्व तहसीलदारांकडे राहणार आहे. त्यांना मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व गावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळणार आहे. तत्पूर्वी ज्या गावात कलापथक येणार आहे, त्या गावातील ग्रामसेवकाला ही माहिती गावकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. कलापथकाचा ग्रामीण भागातील नागरिकांवर चांगला प्रभाव पडतो. कलेच्या माध्यमातून सांगितलेली एखादी बाब ही गावकऱ्यांच्या कायम स्मरणात राहते. त्यामुळे शासनाने विविध योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलापथकाचा आधार घेतला आहे.
शासनाच्या योजनांची माहिती गावोगावी पोहचवण्याचे काम करणाऱ्या कलापथकाच्या प्रमुखाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यासंबंधी करार करणे आवश्यक आहे. विशेषत: तालुक्यातील कलापथकाला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील कुही, सावनेर, नरखेड, काटोल या तालुक्यात कलापथकाद्वारे हे काम सुरू झाले आहे. यापूर्वीसुद्धा आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कलापथकाचा आधार घेण्यात आला होता. त्यामध्ये संतती नियमन, पोलियोलसीकरण, बाळ व मातांच्या आरोग्याचे रक्षण, विविध आजार होण्यापासून उपाययोजना आदींचा समावेश होता. परंतु त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही.
राजस्व अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले देण्याची मोहीम, त्यांच्या शाळा व महाविद्यालयीन स्तरावर राबवली जाते. या योजनेला शाळा, महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा