शहराचा विकास कुठल्याही एकाच बाजूने होत नाही तर साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे. असे महोत्सव लोकाश्रयातून आयोजित करणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन महापौर अनिल सोले यांनी केले.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या स्वरसाधना संगीत महोत्सवाच्या समारोपप्रसंगी महापौर सोले बोलत होते. कार्यक्रमाला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, माजी मंत्री रणजित देशमुख, डॉ. कुमार शास्त्री, भाऊसाहेब झिटे, हेमंत सोनारे, आचार्य विवेक गोखले. डॉ. पी.के. देशपांडे, पं. प्रभाकरराव देशकर, चैतन्य मोहाडीकर, श्याम देशपांडे, संजय चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कुठलाही महोत्सवाला राजाश्रय हा मिळतोच, मात्र त्यासाठी लोकाश्रयाची गरज असते. आज लोकाश्रयाला जास्त महत्त्व असून त्यातूनच शहराचा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक विकास होत असतो. या संगीत महोत्सवाने अनेक स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कुठलाही महोत्सव आयोजित करताना अनेक अडचणी येत असतात, त्यातून मार्ग निघतो. नागपूर ही कलावंतांची गंगोत्री असून अनेक मान्यवर कलावंत या शहराने दिले आहेत. हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जाईल आणि त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन सोले यांनी दिले. यावेळी प्रवीण दराडे आणि कुमार शास्त्री यांची भाषणे झाली.
 पं. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य पं. प्रभाकरराव देशकर यांनी वसंतरावांच्या जीवनातील सुरेल असा स्मृतीगंध रसिकांसमोर सादर केला. या कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे आणि राम भाकरे यांनी गीते सादर केली. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य राजाभाऊ बोबडे यांचे शास्त्रीय गायन झाले. यावेळी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते अक्षय चारभाई, अमर्ष पुसतकर, भाग्यश्री टिकले, साक्षात कटय़ारमल, आकांक्षा चारभाई, मधुली कुळकर्णी, अनिता समुद्रे, अवंतिका पाध्ये, प्रबल सरकार, छाया सरोदे, डॉ. अरुण पांडे, कैवल्य केसकर आणि मेहरा रामडोहकर यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी रायलू यांनी तर प्रास्ताविक चैतन्य मोहाडीकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा