पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही अपेक्षेप्रमाणे नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या कोळवाडीतील तरुणांनी हिंमत न हारता गावच्या विकासात पुढाकार घेतला. पडेल ते काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालविताना गावाला सांस्कृतिक चेहरा देण्याचा प्रयत्न या तरुणांनी प्रयत्नपूर्वक केला. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले.
चंद्रसेन मोरे हा तरुण पदवीधर चक्क हमालीकाम करतो. इतर पदवीधरांमध्येही कोणी किराणा दुकान, तर काहीजण जीप, ट्रॅक्टरचे चालक आहेत. एक हजार लोकवस्तीच्या कोळवाडीत गेल्या दहा वर्षांत पदवीधर झालेल्या दोघांना कशी तरी ग्रामसेवकाची, तर काहींनी खासगी नोकरी मिळवली. परंतु इतर ४० पदवीधरांना पडेल ते काम करावे लागत आहे. त्यामुळे शिकून उपयोग काय, असा प्रश्न ते स्वतलाच विचारतात. शिरूरकासार तालुक्यातील सिंदफणा नदीवरील डोंगरकुशीत वसलेले कोळवाडी हे एक हजार लोकवस्तीचे गाव. शिरूरहून डांबरी रस्ता थेट गावात जातो. आजूबाजूला नदीमुळे बागायती जमीन दिसते. पण येथील सारेच अल्पभूधारक. शेती हा एकमेव उद्योग. गावात सातवीपर्यंत शाळा. बाबासाहेब गित्ते नावाच्या शिक्षकाने १३ वष्रे शाळेत सेवा करताना गावाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गावातील प्रत्येक घरातले मूल आज शाळेची वाट नक्की धरतं. मुलींच्या शिक्षणाचं प्रमाणही तसं चांगलं. मात्र, गेल्या दहा वर्षांत पदवीधर झालेल्या तरुणांची व्यथा वेगळीच आहे. आतापर्यंत गावातील ५७ तरुणांनी विविध शाखांची पदवी मिळवली; पण सरकारी नोकरी मिळेल, ही त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. दोघा तरुणांना ग्रामसेवकाची, तर काहींना खासगी कंपन्यांमध्ये काम मिळालं. मात्र, आजही ४० पदवीधर तरुण गावातच पडेल ते काम करीत आहेत. चंद्रसेन मोरे (वय ३२) हा पदवीधर शेतीबरोबरच हमालीकाम करतो. बाळासाहेब येवले, अंकुश नेटके, अमोल चव्हाण, सोनाजी सिरसाट यांच्यासारखे पदवीधर शेतीसह जीप, ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. इतर काहींनी कापूस वेचण्यापासून शेतीत स्वत:ला गुंतवून घेतले. पदवीधर होऊन पुढे काय, असा प्रश्न या तरुणांसमोर होता. पण गावाला सांस्कृतिक चळवळीची परंपरा असल्याने शिकून नोकरी लागली नाही, तरी हे तरुण गावच्या विकासासाठी मात्र एकत्र असतात. गावातील सूर्यकांत नेटके, शरद चव्हाण हे प्रसारमाध्यमात आहेत, तर विठ्ठल जाधव हे लेखक म्हणून परिचित आहेत. कलासंगत नाटय़मंडळ गावाचे वैभव आहे. मंडळाने राज्य नाटय़ स्पध्रेपर्यंत मजल मारली. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या या गावात सामाजिक ऐक्य व शांतता हातात हात घालून नांदते आहे.