शहरातील घनकचऱ्याची वाहूतक करण्यासाठी अद्याप कंत्राटदार नेमला न गेल्याने नवी मुंबईतील स्वच्छतेचे पार तीन तेरा वाजले असून साफसफाई कामावर देखरेख ठेवणारे स्वच्छता निरीक्षकांसह काही साफसफाई कामगारदेखील लोकसभा निवडणुकीच्या शासकीय कामाला जुंपले गेल्याने या अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे.
भर उन्हाळ्यात कचरा सडण्याची गती वाढली असून डास आणि त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. तरीही प्रशासन ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही. त्यामुळे मतदारांना नाक मुठीत घेऊनच मतदार केंद्रावर जावे लागणार असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील कोपरी भागात जमणाऱ्या कचऱ्याच्या दरुगधीमुळे मतदार नकारात्मक मताचा अधिकार गाजवणार आहेत. नवी मुंबईतील घनकचऱ्याची साफसफाई दररोज होत आहे, पण त्यासाठी लागणारी योग्य वाहतूक यंत्रणा नसल्याने सायबर सिटी म्हणविणाऱ्या शहराची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली जात आहेत. बारा लाख लोकवस्तीत निर्माण होणारा सहाशे मेट्रिक टन घनकचरा दोन हजार साफसफाई कामगारांकडून दररोज स्वच्छ करून घेतला जात आहे. त्यासाठी ८१ कंत्राटदारांना हे काम देण्यात आले होते, ती संख्या आता ९१ केली जाणार आहे. त्यामुळे साफसफाई कामगारांची संख्यादेखील वाढणार आहे.
साफसफाई कंत्राट अद्याप देण्यात आलेले नसून वाहतूक कंत्राटाची प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक कंत्राट कार्यान्वित होण्यासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
ही दोन्ही कंत्राटे सध्या रखडली असून शहरातील कचऱ्याची दैनंदिन साफसफाई बऱ्यापैकी होत आहे, पण त्याची वाहतूक आणि विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण आणि त्यामुळे रोगराई मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. साफसफाई कंत्राटदारांकडून उचलण्यात आलेला कचरा वाहतूक खर्च वाचावा म्हणून निर्जन स्थळी टाकला जात आहे. त्यामुळे रोगराई वाढली असून अनेक खासगी रुग्णालयांत मलेरियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेच्या अडीच हजार कामगारांपैकी १६०० कामगार हे लोकसभा निवडणुकीच्या कामाला गेले आहेत.
यात स्वच्छता निरीक्षकासह काही साफसफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी आणखी साफसफाई कामगार मागत होते, पण हे कामगार एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना घेतल्यास पंचाईत होईल, असे प्रशासनाने लक्षात आणून दिल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने आपली मागणी पुढे रेटली नाही. साफसफाई कामातील कामगारांची रोडावलेली संख्या, वाहतूक कंत्राटाची लांबलेली प्रक्रिया यामुळे २१ व्या शतकातील शहरात सकाळी कामगार हाताने कचरा भरताना पाहावे लागत आहे.
साफसफाई कंत्राटातील हे कामगार कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची काळजी न घेता हे काम करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघडय़ा ट्रकने हा कचरा वाहतूक केला जात असल्याने तो रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे फावत असून त्यांच्यात त्या कचऱ्यावरून राडा होत असल्याचे दृश्य दिसून येते. उन्हाळ्याच्या या दिवसांत कचरा सडण्याची प्रक्रिया वेगाने होत असून त्यामुळे दरुगधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. तरीही पालिका प्रशासन ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
आणखी सहा महिने अस्वच्छतेचे दर्शन
वाहतूक कंत्राटाला अद्याप शासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेने किमान वेतन आणि समान काम समान वेतन या दोन्ही पर्यायांना अधीन राहून कंत्राट काढले आहे, पण त्याची पूर्तता होण्यासही अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना अजून सहा महिने उघडय़ावर होणारी कचरा वाहतूक उघडय़ा डोळ्यांनी पाहावी लागणार आहे.