लक्षणांवरून उपचार सुरू करा
स्वाइन फ्लू आणि साध्या तापामधील फरक ओळखणे कठीण असल्याने काही वेळेला योग्य उपचारांविना रुग्णांची स्थिती गंभीर होते असे निदर्शनास येत आहे. मात्र स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता लक्षणांवरून उपचार सुरू केले तर स्वाइन फ्लू हा प्राणघातक ठरणार नाही. स्वाइन फ्लूच्या तापासंदर्भात कधी कोणते उपचार करावेत व काळजी घ्यावी यासंबंधी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत केल्या गेलेल्या सूचना पाळण्याचे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या आठवडय़ाभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जुलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत प्रति दिवशी सरासरी पाच रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या सात दिवसांत दर दिवशी दहा जणांना स्वाइन फ्लू झाल्याची नोंद झाली आहे. डासांवाटे पसरणारे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांपेक्षा पावसाळ्यात हवेतील विषाणू संसर्गावाटे येणाऱ्या तापाचे रुग्ण अनेक पटींनी जास्त असतात. मात्र साधा ताप हा दोनेक दिवसांत उतरत असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. शिवाय या तापादरम्यान या विषाणू संसर्गाविरोधात शरीरात प्रतिकार क्षमताही तयार होते. स्वाइन फ्लू हादेखील एचवनएनवन या विषाणूमुळेच पसरणारा ताप असला तरी काही जणांमध्ये त्याची तीव्रता अधिक वाढते. विशेषत लहान मुले, वृद्ध, दीर्घकालीन आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांच्यामध्ये या विषाणूमुळे धोका वाढतो. त्यातही स्वाइन फ्लूची बरीचशी लक्षणे ही नेहमीच्या साध्या तापासारखी असतात. त्यामुळे त्यांच्यात फरक करणे कठीण जाते. स्वाइन फ्लूदेखील मुंबईच्या दमट वातावरणात वाढू लागल्याने त्याबाबत अधिक काळजी घ्यायला हवी. स्वाइन फ्लूमध्ये जोराच्या तापासोबत श्वासोच्छ्वास घेण्यास अधिक त्रास होतो, हे कारण लक्षात आले तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले.
स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे ही साध्या तापाप्रमाणेच असतात. मात्र तापाचे प्रमाण तसेच घशातील संसर्गाचे प्रमाण वाढले तर ओसेल्टामिव्हीर सुरू करता येईल. प्रत्येक वेळी चाचणी करण्याची तसेच त्याच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी वेळीच उपचार करणे अधिक योग्य आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लूच्या तापासंदर्भात उपाचारांची मार्गदर्शक तत्त्वे
अ गट –
लक्षणे – ताप, कफ, घसा दुखणे, अंगदुखी, अतिसार आणि उलटय़ा –
उपाय – ओसेल्टामिव्हीर (ब्रॅण्ड नेम टॅमी फ्लू) देण्याची गरज नाही. लक्षणांवर उपचार करावेत. चाचणी करण्याची गरज नाही.
ब गट
लक्षणे – अ गटाप्रमाणेच मात्र जास्त ताप आणि घसा अधिक खवखवणे किंवा अ गटाप्रमाणे लक्षणे व गर्भवती /दीर्घकालीन आजार असलेले वृद्ध/ कर्करोगग्रस्त
उपाय – घरीच रुग्णाला सर्वापासून वेगळे ठेवणे (आयसोलेशन), ओसेल्टामिव्हीर द्यावी. चाचणीची गरज नाही.
क गट
लक्षणे – अ व ब गटातील लक्षणे, श्वासोच्छ्वासात अडथळे, मळमळणे, छातीत दुखणे, रक्तदाब खाली येणे, कफाद्वारे रक्त येणे, नखे निळी होणे.
उपाय – तातडीने चाचणी करणे, रुग्णालयात दाखल करून उपचार करणे.
ओसेल्टामिव्हीरचा डोस
१५ किलोपेक्षा कमी – ३० मिली ग्रॅम डोस दिवसातून दोन वेळा
१५ ते २३ किलो – ४५ मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा
२३ ते ४० किलो – ६० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा
४० किलोहून जास्त – ७५ मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा