कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण विलास बाबासाहेब राजळे (वय ४३) यांचे आज सकाळी नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. राजळे यांना स्वाइन फ्लू झाल्याची लक्षणे दिसत असली तरी त्याबाबतचा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांनी दिली.
राजळे गेल्या सोमवारपासून नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यापूर्वी त्यांनी पाथर्डीतील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कासार पिंपळगाव येथे खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्याधिका-यांना दिल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले. नगरमध्ये सन २००९ सारखा स्वाइन फ्लूचा उद्रेक आढळत नसला तरी गेल्या जानेवारीपासून ग्रामीण भागात ७ रुग्ण आढळले आहेत. तर नगर शहरात एप्रिलपासून १४७ संशयित आढळले, त्यातील दोघांनाच स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले, दोघेही ग्रामीण भागातील आहेत व उपचारासाठी शहरात दाखल झाले होते, दोघांची तब्येत सुधारून ते घरी परतल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. राजुरकर यांनी दिली.
डॉ. खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाइन फ्लूच्या रुग्णात घसा खवखवणे, घशास सूज येणे, खोकला, तीव्र ताप व डोकेदुखी, धाप लागणे अशी लक्षणे आढळतात. नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. जिल्ह्य़ातील आरोग्य केंद्रांकडे ‘टॅमीफ्ल्यू गोळ्यांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader