रेल्वे स्थानकांमध्ये कचरा टाकणाऱ्या, रेल्वे स्थानकाशेजारी मार्गात लघुशंका करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुख (स्टेशन मास्तर) यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छतेस तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असून अशी अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
मुंबईच्या उपनगरी रेल्वेतून दररोज सुमारे ७० लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी अनेक उपनगरी रेल्वे स्थानकांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. ज्या स्थानकांवर ही स्वच्छतागृहे आहेत, तेथे त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसून आले आहे. अपुऱ्या स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबद्दल उच्च न्यायालयाने अनेकदा रेल्वे प्रशासनास कडक शब्दांमध्ये ताकीद दिली आहे. असे असूनही रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतागृहांची स्थिती किंवा संख्या यात सुधारणा झालेली नाही. स्वच्छतागृहे अत्यंत वाईट अवस्थेत असल्यामुळे प्रवासी रेल्वे मार्गात लघुशंका करतात, तर अनेकजण गाडीची वाट पाहत असताना फलाटावर किंवा मार्गावर थुंकत असतात. हातातील खाद्यपदार्थ खाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या तशाच स्थानकात टाकून दिल्या जातात.
कचरा टाकण्यासाठी पुरेशा संख्येने कचराकुंडय़ा प्रत्येक स्थानकावर लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवासी कचरा स्थानकात किंवा रेल्वे मार्गात फेकून देतात. कचरा टाकणाऱ्या अथवा थुंकणाऱ्या किंवा लघुशंका करणाऱ्यांवर दंड कारवाई करणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांच्या मनमानीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याऐवजी अशा प्रवाशांना पकडण्यात त्यांना स्वारस्य नसल्यामुळे रेल्वे स्थानकांमधील अस्वच्छता वाढत जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या. घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तापसनीसांना किंवा स्थानक प्रमुखांना मिळावेत अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे वारंवार करण्यात आली होती. अखेर रेल्वे बोर्डाने ही मागणी मान्य करत तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुखांना हे अधिकार देऊ केले आहेत. अस्वच्छतेसंबंधी कोणताही गुन्हा केल्यास थेट ५०० रुपये दंडाची कारवाई तिकीट तपासनीस किंवा स्थानकप्रमुख करू शकतात.
अस्वच्छता करणाऱ्यावर कारवाईचे टीसीला अधिकार
रेल्वे स्थानकांमध्ये कचरा टाकणाऱ्या, रेल्वे स्थानकाशेजारी मार्गात लघुशंका करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुख (स्टेशन मास्तर) यांना देण्यात आले आहेत.
First published on: 19-12-2012 at 02:04 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T c has rights to punish who dose unclean