‘चांदनी बार’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘अस्तित्व’  या चित्रपटांतील भूमिकांसाठी नावाजलेली आणि वेगळ्या वळणाच्या, हटके आणि धाडसी भूमिकांसाठी नावाजली जाणारी तब्बू आता सलमान खानची मोठी बहीण बनणार आहे.
बहुतांश अभिनेत्रींची नायिका म्हणून पडद्यावरची कारकीर्द अल्पजीवी असते. परंतु तब्बूने प्रदीर्घकाळ विविध भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चांदनी बार ते चिनी कम हा तिचा भूमिकांचा प्रवास कोणाही अभिनेत्रीला करावासा वाटेल. त्यामुळेच की काय, सलमान खानचा भाऊ सोहेल खान दिग्दर्शन करीत असलेल्या ‘मेंटल’ या चित्रपटात ती सलमान खानच्या मोठय़ा बहिणीची भूमिका साकारतेय.
सलमानचा एक चित्रपट गाजून थोडे दिवस झाले की लगेच त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण होते. ‘मेंटल’चे पूर्वीचे शीर्षक ‘राधे’ असे होते. शीर्षक बदलले असले तरी अद्याप सलमान खानची नायिका कोण साकारणार ते निश्चित झालेले नाही. करिष्मा कोटक, डायना पेण्टी, डेझी शहा अशा अनेक नावेदित अभिनेत्रींचा यासाठी विचार केला जात होता. परंतु, अद्याप कुणाचेही नाव निश्चित झालेले नाही. ‘दबंग’प्रमाणेच ‘मेंटल’सुद्धा दक्षिणेचा सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘स्टॉलिन’ या मूळ तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारीअखेर दुबईमध्ये सुरू होणार असल्याचे समजते.