ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी एका कुटुंबाला साडेचार ते पाच हजारात पडत असल्याने ऐन दिवाळीच्या सुटय़ांमध्ये पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा खर्च बघता व्याघ्र पर्यटन केवळ गर्भश्रीमंतांसाठी असून गरीबांच्या मुलांनी व्याघ्र भ्रमंतीचा आनंद घेऊ नये काय, असा प्रश्न आम आदमीला पडला आहे.
सलग तीन महिन्याच्या सुटीनंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प १६ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. आता ऑनलाईन बुकिंगमुळे पर्यटकांना घरबसल्या ताडोबा प्रवेशाचे बुकिंग करता येते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुटय़ांमध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी आहे. ताडोबात प्रती वाहन फेरीसाठी ७५० रुपये प्रवेश शुल्क, शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी १ हजार रुपये प्रवेश शुल्क राहील, गाईडला प्रती फेरी तिनशे रुपये शुल्क आहे. हत्ती सफारीसाठी इतर दिवशी देशी पर्यटकांना २०० व सुटीचे दिवशी ३०० रुपये, तर विदेशी पर्यटकांसाठी हत्तीची सफारी इतर दिवशी १२००, तर सुटीचे दिवशी १८०० रुपये आहे. केवळ कॅमेरा शुल्क ५०० रुपये करण्यात आलेला असून ते न भरल्यास दंडात्मक कारवाईची शिक्षा आहे.
व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणाऱ्या जिप्सी व इतर वाहनांची निर्मिती २००२ नंतरची व मिनिबससाठी २००७ नंतरची बंधनकारक आहे. ही सर्व वाहने ताडोबा-अंधारी टायगर कंझव्‍‌र्हेशन फाऊंडेशनकडे नोंदणीकृत होणे आवश्यक आहे. व्याघ्र प्रकल्पाकडे नोंदणी न केलेल्या वाहनांना कोअर झोनमध्ये प्रवेश करायचा असल्यास प्रती वाहन १ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. पर्यटकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. वाहनांचा शुल्क भरून व गाईड सोबत घेऊनच सफारी करावी, सफारी करतांना दोन वाहनात ५० मीटर अंतर ठेवावे, प्रवेशव्दारावर ओळखपत्र व प्रवेशपत्र दाखवावे, सफारी करतांना सोबत पेपर बॅग बाळगावी, शक्यतो निसर्गाशी मिळतेजुळते कपडे घालावे, वाहनाची वेग मर्यादा ताशी २५ कि.मी. ठेवावी, सफारी वाहन वन्यप्राण्यांपासून २० मीटर दूर ठेवावे, निर्धारित वेळेच्या आत संरक्षित क्षेत्राबाहेर यावे, रस्त्याखाली वाहन नेण्यास व उभे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिप्सी घेऊन ताडोबाची सफारी करायची असेल तर किमान २ हजार रुपये सहा व्यक्तींना लागतात, तर स्वत:च्या गाडीने गेले तर १ हजार रुपये शुल्क आकारले जात आहेत.
ताडोबा व्यवस्थापनाकडून पर्यटकांची सुरू असलेली ही आर्थिक लूट बघता दिवाळीच्या सुटीत व्याघ्र सफारीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये कमालीची नाराजी आहे. ताडोबाचे आठवडाभराचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल आहे. त्यात सर्वसामान्य माणूस कुठेही दिसत नाही. याचाच अर्थ, ताडोबाची व्याघ्र सफारी ही आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची झालेली आहे. यंदाच्या दिवाळीत केवळ कपडे, फटाके वा इतर वस्तूंचे भावच अस्मानाला भिडले नाही, तर व्याघ्र भ्रमंतीही महागली, अशी प्रतिक्रिया पर्यटक बोलून दाखवित आहेत. केवळ व्याघ्र दर्शन महागलेच नाही, तर एनटीसीएने कडक र्निबध लादल्यानेही पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी तर व्याघ्र भ्रमंतीच्या शुल्कात कपात करण्याचे सूचविले आहे, परंतु काही अधिकारी त्याला विरोध करत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांनी खासगी गाडय़ांनाही प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
अशा वेळी केवळ जिप्सीचा उपयोग व्याघ्र भ्रमंतीसाठी करता येणार आहे. या निर्णयामुळे जिप्सी चालकांची मनमानी वाढेल आणि पर्यटकांची आर्थिक लूट सुरू होईल, असे काहींनी सूचविले, परंतु अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत, अशी माहिती एकाने दिली.

Story img Loader