तब्बल चार महिन्यांनी न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली असून दिवाळी व नाताळाच्या सुटय़ांची बुकिंग आतापासूनच हाऊसफुल्ल झालेली आहे. व्याघ्रदर्शनाचे पर्यटकांना असलेले आकर्षण लक्षात घेता बंदीनंतरही ताडोबाने गर्दी खेचली आहे. पट्टेदार वाघांच्या वास्तव्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जगाच्या पातळीवर प्रसिध्दीस आला आहे. ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाने जून ते १९ ऑक्टोबपर्यंत सलग चार महिने हा प्रकल्प बंद ठेवला. न्यायालयाने काही तांत्रिक अटींचे पालन करण्याचे निर्देश वनखात्याला देऊन बंदी उठविल्यानंतर २० ऑक्टोबरपासून हा प्रकल्प पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. तेव्हापासून ताडोबात पर्यटकांनी गर्दी केली आहे. ताडोबात मोहुर्ली, कोलारा व कोळशी गेटमधून नियमित ५२ गाडय़ा सोडण्यात येत आहेत. यात सर्वाधिक २७ गाडय़ा या मोहुर्ली प्रवेशव्दारावरून सोडण्यात येत आहेत. या सर्व गाडय़ांमध्ये पर्यटकांची गर्दी कायम आहे. शनिवार, रविवार व शासकीय सुटींच्या दिवशी एक हजार रुपये गाडी भाडे केल्यानंतरही पर्यटक येत आहेत ते केवळ वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी. वाघोबाही पर्यटकांना निराश करत नसल्याचे चित्र सध्या ताडोबात आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो प्रमाणे मोहुर्ली प्रवेशव्दाराहून जाणाऱ्या प्रत्येक गाडीतील पर्यटकाला वाघाने दर्शन दिले आहे. ताडोबा, मोहर्ली व कोळशी अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागल्या गेलेल्या या प्रकल्पात सात उपक्षेत्र व ३४ नियतक्षेत्रे आहेत. या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण पट्टेदार वाघ असून व्याघ्रगणनेच्या नोंदीनुसार ४३ वाघांचे व २२ बिबटय़ांचे वास्तव्य येथे आहे. ताडोबाचा राजा जरी वाघ असला तरी येथे इतर वन्यजीवांची चांगलीच भरमार आहे. अस्वल, कांचनमृग-चितळ, सांबर, रानगवा, रानडुक्कर, निलगाय, रानकुत्रे, काकर, चौशिंगा, असे ४५ जातींचे वन्यप्राणी या प्रकल्पात वास्तव्याला आहेत. याशिवाय, उदमांजर, चांदी अस्वल, उडणारी खार, राजमांजर, तीन हत्ती व शंभरावर मगरी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तीस व २८३ जातींचे पक्षी, त्याशिवाय २६ प्रकारचे कोळी, २३ जातीचे मासे, ९४ प्रकारची रंगबेरंगी फुलपाखरांसोबत संरक्षित वनात साग, बांबू, मोहा, जांभुळ, शिसम आदि ६६ वृक्षांच्या प्रजाती येथे आहेत. झुडपांच्या २३, तर वेलींच्या ११ जाती येथे आहेत. बांबूला पकडून २६ जातीचे गवत या प्रकल्पात आहे. निसर्गाच्या कोंदणातील हिरा असलेल्या ताडोबात १८५ मचाणी, १७५ गुंफा, सात तलाव आहेत. या प्रकल्पातील कोळसा, बोटेझरी, पळसगाव, रानताळोधी, जामनी, नवेगाव या सहा गावांपैकी कोळसा, बोटेझरी व पळसगाव या तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. निसर्ग सौंदर्य व वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाकरिता सुमारे चाळीस हजार पर्यटक दरवर्षी या प्रकल्पाला भेट देतात. त्यामुळे सलग चार महिने प्रकल्प बंद झाल्याने त्याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, असे बोलले जात होते, परंतु उलट बंदीमुळे फायदाच झाला असून पर्यटकांची संख्या वाढलेली असल्याची माहिती गाईडने दिली. सध्या रोजचे बुकिंग फुल्ल असून दिवाळी व नाताळाच्या सुटीतील बुकिंगला आतापासून सुरुवात झालेली असून जवळपास हाऊसफुल्ल झालेली आहे. ऑनलाईन बुकिंगही सुरू आहे. हे चित्र बघता ताडोबातील वाघोबाच्या दर्शनाला दिवाळी व नाताळात पर्यटकांची गर्दी राहणार आहे.

Story img Loader