संततधार पावसामुळे येथील तहसील कार्यालयाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. छतालाच गळती लागून तेथील संगणक, महत्त्वाची कागदपत्रे पाण्याने भिजली आहेत. तहसीलदार राहुल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तहसील कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून मागणी केली आहे. कोपरगाव नगरपालिकेची इमारत, तसेच येथील दुय्यम कारागृहांतही मोठी गळती लागल्याने इमारतीत धोके निर्माण झाले आहेत.
कोपरगाव नगरपालिकेच्या जुन्या रुग्णालयाच्या जागेत सध्याचे तहसील कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून पावसाच्या पाण्यामुळे संगणक, विविध महत्त्वाची कागदपत्रे अक्षरश: भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू होता, त्या काळात तहसीलदार, तसेच निवासी नायब तहसीलदार, इतर कर्मचा-यांना बसण्यास जागा उरली नव्हती. सर्वच्या सर्व इमारतीस गळती लागल्याने तहसीलदारांसह सर्वाना छत्री धरून बसण्याची वेळ आली होती.
तहसीलदार जाधव यांनी पीपल्स बँकेची पर्यायी जागा पाहिली, मात्र तेथेही डागडुजी करावी लागणार आहे. तहसीलच्या सध्याच्या कार्यालयाची डागडुजी, वॉटरप्रूफिंग करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागास दिला, मात्र त्यांनी तो नाकारल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. जुन्या तहसील कार्यालयातील असलेल्या दुय्यम कारागृहांसही गळती लागल्याचे तुरुंगरक्षक कुलथे यांनी सांगितले.त्याबाबत वरिष्ठांना कळवल्याचे ते म्हणाले. कोपरगाव नगरपरिषद इमारतीची अवस्थाही या पेक्षा वेगळी नाही. सर्वच्या सर्व कार्यालये गळत आहेत.

Story img Loader