इतिहासाने माणसाला समृद्ध बनवले असून त्यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. इतिहासामध्ये अनेक चुका झाल्या आहेत, त्या समजून घेऊन त्यांच्या दुरुस्तीतून संस्कृतीचे पुनरुज्जीवन करा, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अंबरनाथमध्ये केले. दि एज्युकेशन सोसायटीच्या प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्राचीन भारतीय संस्कृती व राजनीती यांची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयावर आधारित या परिषदेस देशभरातील विविध प्रांतांतून मान्यवर संशोधक उपस्थित होते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यासह बनारस विश्व विद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या बिं. दा. परांजपे, तंजावर भीम स्वामी मठाचे मठाधिपती दि. रामचंद्र, संस्थेचे कार्यवाहक श्रीकांत देशपांडे, प्राचार्य श्रीकांत वाटवे आणि डॉ. विद्या गाडगीळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाचा आधार घेत सद्यस्थितीवर मार्मिक टिप्पणी केली.
सध्याच्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रस्त्यांवरून प्रवास करताना प्राचीन काळाच्या दिशेने आपला प्रवास होतो आहे की काय, अशी शंका निर्माण होते. सध्या भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटना वाढू लागल्या असून त्या रोखण्याची जबाबदारी आपलीच आहे. भारतीय परंपरा लोप पावत आहे. वनसंवर्धन होत नाही, त्यामुळे वनौषधींचा खजिना नाहीसा होत आहे; तर पारंपरिक कीर्तन, प्रवचन चेष्टेचा विषय ठरतो ही खेदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, लोकमान्य टिळकांसारख्या प्रत्येक श्रेष्ठ व्यक्तींनी या पारंपरिक गोष्टींना प्रोत्साहन दिले होते. अशा परिसंवादातून त्याला पुन्हा ऊर्जित अवस्था मिळेल, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी विद्यार्थासाठी कीर्तनाची उपयुक्तता यावर त्यांनी विवेचन केले. कीर्तन हा संस्कृतीचा स्रोत असून देशातील नव्या पिढीचे मनोरंजन आणि संस्कार करण्याचे सामथ्र्य कीर्तनात आहे; तर प्राचीन भारतीय राजनीती आणि राजतंत्र लोककल्याणकारी होते, असे मत डॉ. विजयकुमार भारुडकर यांनी व्यक्त केले. राजमुद्रादेखील समाज कल्याण डोळ्यासमोर ठेवून बनवली जात होती.
भारतातील व्यापार, कला, विज्ञान आणि ज्ञानाचा विकास होण्यामागे त्या काळातील राजधर्माचा सगळ्यात मोठा वाटा होता, असे मत भारुडकर यांनी व्यक्त केले. भारतातील तक्षशीला आणि नालंदा ही विद्यापीठे आक्रमकांनी जाळून टाकली; मात्र आजही जागतिक गणिताचा डोलारा भारतीय गणितशास्त्रावर अवलंबून आहे, असे मत मोहन आपटे यांनी व्यक्त केले.

Story img Loader