ग्राहक पंचायतीची मागणी
नाशिकसह काही महानगरात १ एप्रिलपासून सेट टॉप बसविल्याशिवाय वाहिन्या दिसणार नसल्याने काही केबलचालकांनी याआधीच काही वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद केले आहे. वास्तविक, मुदतीपूर्वी या पद्धतीने वाहिन्यांचे प्रक्षेपण केबलचालकांना बंद करता येत नाही. केबलचालकांच्या या कृतीचा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत व अनेक ग्राहकांनी निषेध केला आहे. खुलेआम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केबलचालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
नाशिकसह काही महानगरात १ एप्रिलपासून सेटटॉप  बसविल्याशिवाय केबलवरील वाहिन्या दिसणार नाही. ही बाब लक्षात घेऊन काही केबलचालकांनी कित्येक दिवस आधीच काही वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करून टाकले. ही बाब ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. या संदर्भात काही ग्राहकांनी मते मांडली. डिजिटायझेनसाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ३१ मार्चनंतर सेटटॉप बॉक्स शिवाय वाहिन्या दिसणार नाही, याविषयी सर्वाना माहिती आहे. त्यामुळे काही ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविले तर काही अजून त्या प्रक्रियेत आहेत. या परिस्थितीत केबल चालकांकडून देण्यात येणाऱ्या सेवेसाठी संबंधित ग्राहकांनी महिनाभराचे शुल्क भरले आहे. असे असताना शहर परिसरात काही केबल चालकांनी विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद केले.
त्यात काही वृत्त वाहिन्यांचाही समावेश आहे. वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करण्याची कृती अयोग्य, नियमबाह्य असल्याचे मत विवेक ठकार यांनी व्यक्त केली. ज्या वृत्तवाहिन्या बंद झाल्या, त्या वाहिन्या अतिशय महत्वाच्या होत्या. केबलचालकांच्या या कार्यशैलीवर ग्राहक पंचायतीने टीकास्त्र सोडले आहे. मुदतीपूर्व वाहिन्या बंद करण्याची केबलचालकांची कृती निषेधार्थ असल्याचे मत नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने नोंदविले आहे. केबल चालकांचा हा मनमानी कारभार अन्यायकारक व नियमबाह्य़ आहे. या प्रश्नी जिल्हाधिकारी तथा केबल परवाना देणारे अधिकारी यांनी या पद्धतीने वाहिन्या बंद करणाऱ्या केबलचालकांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी आणि पूर्ववत सर्व वाहिन्या दाखविण्यासाठी बाध्य करावे, अशी मागणी पंचायतचे विलास देवळे यांनी केली आहे. तसेच सेटटॉप बॉक्सची किंमतही जिल्हाधिकारी, केबल संघटना व ग्राहक संघटनांनी ठरवावी. ही रक्कम ग्राहकांकडून तीन टप्प्यात वसूल करावी, याकडे देवळे यांनी लक्ष वेधले. या संदर्भात काही तक्रार असल्यास किंवा अधिक माहितीसाठी ९४२२२ ६६१३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.