राजीव गांधी जीवनदायी योजना सामान्यांसाठी आरोग्यदायी व लाभदायक असल्याने कर्नाटकात दोनवेळा तेथील सरकार येऊ शकले. हा प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले असून मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने योजनेचा लाभ संबंधित रुग्णांना मिळावा यासाठी आरोग्यमित्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्य़ातील १२ तालुक्यांमध्ये कार्यालय सुरू करून मदत केली जाणार आहे, अशी माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील बडय़ा ४६ इस्पितळांनी जीवनदायी योजनेत सहभागी होण्यास नकार दर्शविल्याच्या पाश्र्वभूमीवर मुश्रीफ यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून या योजनेतून राज्य शासन बदनाम होणार नसल्याची काळजी घेत असल्याचे नमूद केले.    राज्यातील आघाडी शासन व त्याअंतर्गत होत असलेले प्रखर मतभेद या पाश्र्वभूमीवर आघाडीचे भवितव्य काय राहील या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, राज्य असो की देश पूर्वीच्या राजकारणाचे दिवस आता राहिले नाहीत. अनेकांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विरोधकांमध्ये मोठय़ा प्रमाणात दुफळी निर्माण झाली आहे, या पाश्र्वभूमीवर सामान्यांच्या हिताच्या पाहणी केलेल्या आघाडीलाच पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.    
मुख्यमंत्र्यांसमवेत शनिवारी झालेल्या ऊस दर प्रश्नामध्ये निर्णय झाला नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मुश्रीफ म्हणाले, ऊस-साखर उद्योगाचे अनेक प्रश्न गंभीर आहेत. याबाबत पंतप्रधानांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत, त्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटण्यासाठी जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५०० रुपयांचा पहिला हप्ता आणि २०० रुपयांचे दोन हप्ते असा तोडगा काढण्यास एकमत होण्याची शक्यता आहे. साखरेचे दर भविष्यात वाढणार असल्याने उसाला चांगला दर देणे योग्य ठरेल, असे मतही त्यांनी नोंदविले.