नवा नोकर ठेवताना त्याची पूर्ण खात्री करा, त्याची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करा आणि मगच त्याला कामावर ठेवा, असे आवाहन पोलीस वारंवार करीत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना नंतर त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुंबईत गेल्या आठवडय़ात घडलेल्या तीन लुटीच्या घटनांमध्ये नव्या नोकरांनीच हातसफाई केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी कामावर रूजू झालेल्या कामगारांनी संधी मिळताच घर लुटून नेले. मालकांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचे फावत आहे.
लालचंद जैन यांचे जोगेश्वरीमध्ये अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी एका परिचिताच्या माध्यमातून १० दिवसांपूर्वी कमलेश चौधरी याला कामावर ठेवले. त्याची कसलीच माहिती जैन यांनी घेतली नव्हती. तो राजस्थानचा आहे, एवढेच त्यांना माहीत होते. सोमवारी त्यांचे दुकान बंद असते. दुकानाच्या जवळच राहणाऱ्या जैन कुटुंबियांच्या घरी ११ डिसेंबर रोजी दुपारी कमलेश गेला. त्यावेळी जैन यांची पत्नी एकटीच घरात होती. मोठय़ा मुलाने दुकानाची चावी मागितली आहे, असे कमलेशने सांगताच जैन यांच्या पत्नीने ती दिली. थोडय़ा वेळाने त्यांचा मुलगा घरी परतल्यावर आपण कमलेशबरोबर पाठवलेली चावी मिळाली का, अशी विचारणा त्याच्या आईने केली. आपण चावी मागविलीच नव्हती असे सांगून तो दुकानाच्या दिशेने धावत गेला. पण तोपर्यंत कमलेशने दुकानातील १० किलो सोने आणि अडीच लाख रुपये असा एकूण अडीच कोटींचा ऐवज लुटून पळ काढला होता.
वाळकेश्वर येथील ‘गार्डन व्ह्य़ू’ इमारतीच्या नवव्या मजल्यावर शाह दाम्पत्य राहातात. त्यांची विवाहित मुलगी याच परिसरात राहते. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी अजय पंडित (२५) नावाच्या नोकराला कामावर ठेवले होते. तसेच त्यांना आणखी एका नोकराची गरज होती. १३ डिसेंबर रोजी स्मिता शाह (६५) या घरात एकटय़ाच होत्या. त्यांचे पती कामानिमित्त गुजराथला गेले होते. ही संधी साधून अजयने स्मिता शाह यांना फोन केला. आपला एक मित्र काम करण्यास तयार असल्याचे अजयने त्यांना सांगितले. काही वेळाने अजय दोन मित्रांना घेऊन शाह यांच्या घरी आला. घरात शिरताच त्यांनी स्मिता शहा यांना मारहाण केली आणि प्रसाधनगृहात कोंडून ठेवले. यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने मिळून साडेतेरा लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. यातील मुख्य आरोपी अजय पंडित याला ‘गुन्हे शाखा २’च्या पथकाने अटक केली आहे.
पवई येथे राहणारे हिरे व्यापारी सचिन सूर्या (४०) यांनाही खातरजमा न करता कामाला ठेवलेल्या नव्या वाहनचालकाने चांगलाच हात दाखविला. १३ डिसेंबर रोजी त्यांच्या नव्या वाहनचालकाने गाडीतील २० लाख रुपये घेऊन पळ काढला. रामशिव लोध (२८) असे त्याचे नाव. लोध हा १५ दिवसांपूर्वी सूर्या यांच्याकडे कामाला लागला होता. सूर्या यांनी त्याच्याकडून कसलीच माहिती घेतली नव्हती. कुणाच्या तरी ओळखीने तो कामावर आला होता. सूर्या नेहमी रोख रक्कम घेऊन ये-जा करीत असल्याचे त्याने पाहिले होते. १३ डिसेंबरला त्याने संधी साधली. विक्रोळी पूलाजवळ नातेवाईकांकडे जायचे आहे, असे सांगून त्याने गाडी थांबवली. सचिन सूर्या मागचे दार उघडून पुढे येत असतानाचा त्याने गाडी सुरू करून गाडीतील २० लाख रुपयांसह पळ काढला. कांजूर येथे त्याने गाडी सोडून दिली. लोधबाबतही काहीच माहिती नव्हती. पण ‘गुन्हे शाखा  ७’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील, पोलीस निरीक्षक सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल ढोले, प्रवीण पाटील, विजय कदम, सपना क्षीरसागर आदींच्या पथकाने लोधला शोधून काढले आणि अटक केली.
नवीन नोकर कामावर ठेवताना पोलिसांना त्याची माहिती दिल्यावर त्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी  समजते आणि नंतर त्याने काही गैरकृत्य केलेच, तर त्याला पकडणे सोपे जाते असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे नागरिकांना अनेक गोष्टी ज्ञात आहेत. पण ते चुका करतात आणि नंतर पश्चातापाची वेळ ओढवते, असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी नोकरांनीच हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नोकर कितीही जवळचा असला तरी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Story img Loader