स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारा नेता, चिनी वस्तू हटाओ, एफडीआय, केंद्र सरकार, दहशतवादी, भ्रष्टाचारी नेता आदी विषयांवर तयार करण्यात आलेल्या १० बडग्यांसह ऐतिहासिक काळी व पिवळी मारबतींची डीजे आणि ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या १० बडग्यांपैकी केंद्र सरकार, आसाराम बापू, काळा पैसा ठेवणारे नेते, नारायण साई, दबंग सलमान खान आणि स्वतंत्र विदर्भाला विरोध करणाऱ्या नेत्याचा बडगा मिरवणुकीचे खास आकर्षण होते. खड्डे, भ्रष्टाचार, महागाई ‘घेऊन जा रे मारबत’, अशा घोषणा देत समाजातील अनिष्ट प्रथांचा यावेळी निषेध करण्यात आला.
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत गेल्या अनेक वषार्ंपासून समाजातील अनिष्ट प्रथाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या ऐतिहासिक काळ्या, पिवळ्या मारबतींसह विविध सामाजिक प्रश्नांवर खास तयार केलेल्या प्रतिकात्मक बडग्यांची जंगी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, शिवाजी पुतळा या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. डीजेवर वाजविल्या जाणाऱ्या गीतांवर तरुणाई बेधुंद नाचत होती. यावर्षी छोटे मोठे ११ बडगे आणि ६ मारबती सहभागी झाल्या होत्या. या माध्यमातून खड्डे, भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद, स्वतंत्र विदर्भ, चीन वस्तूंवरील बंदी , बुरे दिन आये अशा अशी घोषणा करीत केंद्र सरकारवर असलेली नाराजी आणि आसाराम बापूंवरटीका करण्यात आली.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करणारा बडग्या काढून निषेध केला. मस्कासाथ भागातील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाचा ‘काश्मीर बचाओ, पाकिस्तान हटाव’ हा बडग्याही चर्चेचा विषय ठरला. विदर्भ क्रांती दलाने बुरे दिन आये म्हणत केंद्र सरकारवर नाराजी असलेला बडग्या तयार केला होता. मासूरकर चौकातील बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळाने विदर्भाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा बडगा तर खैरीपुरा मित्र बडग्या उत्सव मंडळ व विदर्भ क्रांती दलाने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा बडग्या तयार केला होता. या शिवाय दहशतवादी संघटनेकडून होत असलेले हल्ले, सीमेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार या विषयावर बडगे तयार करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयश आलेल्या सरकारचे बडग्याने लक्ष वेधून घेतले. महागाईवर नियंत्रण नसलेल्या केंद्र सरकारचा बडग्या मिरवणुकीत होता. बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळ, नवयुवक क्रीडा मंडळ, शिवमंदिर सार्वजनिक बडग्या उत्सव, युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाने विविध विषयांवर बडगे तयार केले होते. काळी आणि पिवळी मारबत हे लोकांचे खास आकर्षण होते. शहीद चौकात दोन्ही मारबती एकत्र आल्या त्यावेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झली होती. तत्पूर्वी सकाळी तऱ्हाने तेली समाजतर्फे काढण्यात येणारी ऐतिहासिक आणि पारंपरिक अशी १३२ वर्षे जुन्या पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमिटीतर्फे काढण्यात आलेल्या काळ्या मारबतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहीद चौक, गांधी चौक, बडकस चौक, शिवाजी पुतळा, चिटणीस पार्क, अग्रेसन चौक, जागनाथ बुधवारी, हंसापुरी मार्गे पिवळी नदीवर मारबतींचे विसर्जन करण्यात आले. दुपारी १२.३० च्या सुमारास पिवळी मारबत शहीद चौकात आल्यानंतर परिसर ढोल ताशांच्या निनादात दुमदुमून गेला. मिरवणुकीदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मिरवणुकीमुळे महाल आणि इतवारी भागात जाणारी वाहतूक दुपारी १२ वाजतापासून बंद करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा