मोबाईल, कॅमेऱ्यामधील मेमरी कार्ड आणि हार्डडिस्कमध्ये डेटा साठवताना सावधान. तुमच्या मेमरी कार्डमधील खासगी छायाचित्र इंटरनेटवर राजरोसपणे पण तुमच्या नकळत प्रसारित केली जात आहेत. हा डेटा तुम्ही ‘डिलिट’ केला तरी तो ‘रिकव्हर’ करता येतो, म्हणजेच परत मिळवता येतो. हे मेमरी कार्ड जर गहाळ झाले तर त्यातील छायाचित्रादी माहितीचा गैरवापर होऊ शकतो. सायबर सेल पोलिसांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंटरनेटवरील अनेक अश्लील संकेत संकेतस्थळांवर ही छायाचित्रे अपलोड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
मोबाईल आणि कॅमेऱ्यामधील मेमरी कार्ड अगदी छोटे म्हणजे नखाएवढी असतात. आपण त्यावरील माहिती कॉपी करून ती डिलिट केल्यावर निर्धास्त होतो. पण हे मेमरी कार्ड कुणाच्या हाती पडले तर डिलिट झालेला डेटाही सहज मिळवता येतो. इंटरनेटवर अशी असंख्य फ्री सॉफ्टवेअर आहेत ज्यामुळे असा डिलिट झालेला डेटा अगदी ९० टक्क्यापर्यंत परत मिळवता येतो.यासंदर्भात सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले की, मेमरी कार्ड जर कुणाच्या हाती लागले तर त्यावरील डेटा परत मिळवून त्याचा गैरवापर होत असल्याच्या घटना घडत आहेत. मेमरी कार्ड जर पूर्ण डिलिट केले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे खासगी डेटा मेमरी कार्डमध्ये ठेवू नये, मोबाईल, लॅपटॉपला नेहमी पासवर्ड ठेवावा म्हणजे कुणीही त्यातील मेमरी कार्डचा गैरवापर करू शकणार नाही. एमएमएस संदर्भातील तक्रारींच्या तपासावरून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
’ नेमका धोका काय?
जेव्हा आपण आपला मोबाईल दुसऱ्याला देतो, तो दुरुस्तीसाठी दुकानात देतो किंवा आपला मोबाईल हरवतो तेव्हा त्यातील मेमरी कार्डमधील डेटा कुणीही सहज मिळवू शकतो. त्यातील माहिती, विशेषत: खासगी छायाचित्रे केवळ दुसऱ्याच्या हाती लागतात असे नाही तर वेगाने इंटरनेटवरील अश्लील साइटवर अपलोड होतात.
’ काळजी काय घ्याल?
सायबर तज्ज्ञ निनाद नवघरे यांनी याबाबत सावधगिरीचे उपाय सांगितले आहेत. आपले मेमरी कार्ड शक्यतो कुणाला देऊ नये. इरेझर नावाच्या वर्गवारीतील अनेक सॉफ्टवेअरचा वापर करून मेमरी कार्ड तसेच हार्ड डिस्कवरील सर्व डेटा कायमस्वरूपी डिलिट करावा. ज्याप्रमाणे आपण अ‍ॅण्टिव्हायरस टाकतो त्याच प्रकारे हे इरेझर सॉफ्टवेअर पीसी किंवा लॅपटॉपमध्ये टाकावे. तसेच मोबाईल आणि कॅमेरामधील मेमरी कार्ड या इरेझर सॉफ्टवेअरच्या आधारे कायमस्वरूपी डिलिट करावे.
’ खासगी छायाचित्रे म्हणजे काय?
अनेक प्रेमीयुगुले त्यांची छायाचित्रे काढत असतात. (जेव्हा ती लिक होता तेव्हा एमएमस बनून ती जगभर पसरतात). किशोरवयीन मुले उत्साहाच्या भरात अशी छायाचित्रे, व्हिडियो काढत असतात. स्वत:चे अनावृत्त शरीर बघण्याची एक मानसिक प्रवृत्ती आहे. तरूण मुली, महिला स्वत:ची छायाचित्रे काढतात. अनेक प्रकरणात नवविवाहित जोडपी स्वत:च्या हनिमूनची छायाचित्रे, व्हिडियो काढून ठेवतात. ही खासगी छायाचित्रे व्हिडियो मेमरी कार्डमध्ये सेव्ह केलेली असतात. ती डिलिट करूनही जात नाहीत. मोबाईल गहाळ झाल्यावर किंवा चोरी झाल्यावर त्यातील मेमरी कार्ड वापरून या खासगी छायाचित्रांचा गैरवापर केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा