मनसे करिअर विभागाच्या वतीने आयोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३ या मोफत मार्गदर्शन व सराव परीक्षा शिबिराचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आ. वसंत गिते यांनी केले.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात शिबिराचे उद्घाटन पुण्याच्या लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी आ. गितेंसह महापौर यतिन वाघ, युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक राम खैरनार, कुसुमाग्रज मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दुगजे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मोफत नोट्स तसेच ३० दिवसांच्या शिबिरादरम्यान सराव परीक्षा अशी संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ. गिते यांनी दिले. करिअर विभागाच्या सचिन चव्हाण यांनी जिल्हा स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढावा यासाठी मनसेच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षांविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पायगुडे यांनी मनसेच्या शिबिराचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी ‘अधिकाऱ्यांचा जिल्हा’ अशी नाशिकला ओळख निर्माण करून द्यावी, असे आवाहन केले. युनिव्हर्सलचे खैरनार यांनी राज्य सेवा पूर्वपरीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन, अभ्यासासाठी उपयोगी संदर्भ पुस्तिका, मासिके याबत माहिती दिली. डॉ. जी. आर. पाटील यांनी परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. या वेळी यूपीएससीच्या माध्यमातून असिस्टंट कमांडपर्यंत झेप घेणारा राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय पातळीवर शालेय अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळविणारी अंजना ठमके यांचा गौरव करण्यात आला. शाम बोरसे यांनी आभार मानले.