केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमातील बदल करताना प्रादेशिक भाषा हद्दपार करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे यूपीएससी परीक्षा मराठीतून लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. परिणामी या क्षेत्रात मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे या परीक्षा मराठीतूनच व्हाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जितेंद्र मोटवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नव्या अभ्यासक्रमामध्ये प्रादेशिक भाषा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असल्याने मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांची मुस्कटदाबी होणार आहे. पूर्वी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे आवश्यक होते. त्यात इंग्रजी आवश्यक आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा याचा समावेश होता. प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला किमान एकातरी प्रादेशिक भाषेची ओळख असायला हवी, असा त्यामागे हेतू होता. मात्र, नव्या बदलामुळे या हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. राज्यातील तरुण या परीक्षेत यशस्वी होत आहेत. त्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे युपीएससीची परीक्षा मराठीतून व्हावी, अशी मागणी मोटवाणी यांनी केली.

Story img Loader