फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांवर सहजपणे उपलब्ध होणारी तरुणींची छायाचित्रे मिळवून त्या आधारे संबंधित मुलींची खोटीच अश्लील छायाचित्रे तयार करून त्यांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. किंबहुना अपहरण, मारण्याच्या धमक्या यापेक्षा गुन्हेगारांकरिता खंडणी उकळण्याचा हा ‘राजरोस’ मार्ग बनू लागला आहे. त्यामुळे आपली छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकताना तरुणींनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस करू लागले आहेत.
प्रियकरासोबतचे ‘नाजूक क्षण’ किंवा आपलीच अनावृत्त छायाचित्रे टिपण्याने आतापर्यंत अनेक तरुणी अडचणीत आल्या आहेत, परंतु अशी कोणतीही छायाचित्रे नसतानाही अश्लील छायाचित्रे असल्याचे खोटेच भासवून तरुणींकडे पैशांची मागणी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकारच्या दोन घटनांचा नुकताच छडा लावला. यापैकी पहिली घटना ही नेपियन्सी रोड येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणीला ८ जुलैला एक निनावी दूरध्वनी आला. तुझ्या अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे माझ्याकडे असून ती परत हवी असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने केली. ही रक्कम न दिल्यास ही सर्व छायाचित्रे समाजमाध्यमांवर ‘अपलोड’ केली जातील, अशी धमकी त्याने तिला दिली.
व्यवसायाने वकील असलेली ही तरुणी परळमधील एका मोठय़ा कंपनीत मासिक तब्बल दीड लाख रुपये पगारावर काम करीत होती. तिचे वडीलही मोठे व्यावसायिक होते, परंतु आपली ‘तशी’ छायाचित्रे कधी आणि कुणी काढली हेच तिला समजत नव्हते.
आपले छायाचित्रे तंत्रज्ञानाच्या आधारे ‘तशी’ बनविली असावी, हे तिने ताडले. हिंमत करून तिने मलबार हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली. मग पोलिसांनी सापळा लावून आरोपीला अटक केली. हा आरोपी तिच्याच कार्यालयात काम करणारा शिपाई असल्याचे स्पष्ट झाले. त्याला या तरुणीच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे पैसे उकळण्यासाठी तिला हेरून त्याने हे अश्लील सीडीचे कुभांड रचले.
काही महिन्यांपूर्वी अशीच एक तक्रार पोलिसांकडे आली होती. २४ वर्षांची ही मुलगी मूळची गुजराथची. पण शिक्षणासाठी मुंबईत आलेली. तिचे वडीलही व्यावसायिक होते. तिच्या वडिलांना अज्ञात इसमाने निनावी पत्र पाठवून तुमच्या मुलीची अश्लील चित्रफीत असल्याचा दावा करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ‘आपली मुलगी मुंबईत एकटी राहते, ती कुठल्या वाममार्गाला गेली का, कुणी तिला फसवले का,’ अशा ना ना कुशंकांनी घरचे घाबरून गेले. त्यांनी मुलीकडे विचारणा केली. आपण ‘असे’ कुठलेच कृत्य केले नसल्याचे सांगत तिने वडिलांना धीर दिला. तिने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर समाजसेवा शाखेने तब्बल आठ महिन्यांच्या प्रयत्नानंतर या आरोपीला अटक केली. नयन जाधव नावाचा हा आरोपी
शिंपी होता. त्याला रस्त्यात या मुलीचे पाकीट सापडले होते. त्यात मुलीची सर्व माहिती आणि घरचे क्रमांक होते. या माहितीच्या आधारे त्याने मुलीच्या कुटुंबीयांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.
या दोन्ही घटनांमध्ये संबंधित तरुणींनी हिंमत करून पोलिसांकडे तक्रार करण्याचे धैर्य दाखविले. मात्र अनेकदा तरुणी या बनावाला फसून बळी पडतात. म्हणून आपली छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करताना तरुणींनी खबरदारी घेतली पाहिजे, असे पोलीस सांगतात.
काय काळजी घ्यावी?
* अनेकदा प्रियकराकडून ‘नाजूक क्षण’ टिपण्याचा आग्रह केला जातो. तरुणींनी ‘तशी’ छायाचित्रे काढण्यास स्पष्ट नकार द्यावा. कारण मोबाइल किंवा कॅमेऱ्यातून अशी छायाचित्रे पुसली तरी ती विविध सॉफ्टवेअरच्या सहायाने पुन्हा मिळवता येतात.
* अनेकदा मुली स्वत:चे अनावृत अवस्थेत सेल्फी काढतात. कधी मोबाइल हरवला, दुरुस्तीला दिला तर त्या वेळी अशी छायाचित्रे काढून ती व्हायरल केली जातात.
* अनेकदा माजी प्रियकराकडून अशा अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल केले जाते आणि मग पुन्हा त्या छायाचित्रांची भीती दाखवत पुन्हा बलात्कार केला जातो. त्यामुळे वेळीच या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.
* कुणी छायाचित्रे ग्राफिक्स मदतीने बदलून (मॉर्फ करून) समाजमाध्यमांवर टाकलेली आढळली तर तात्काळ पोलीस ठाण्यात अथवा ‘सायबर सेल’मध्ये तक्रार करावी. असे आरोपी सायबर पोलीस शोधून काढू शकतात.
झटपट पैसा कमाविण्याचा मार्ग
खंडणी उकळण्यासाठी एखाद्याचे अपहरण करावे लागते, हल्ला करावा लागतो किंवा धमकवावे लागते. हे काम धोक्याचे असते. सराईत गुन्हेगार ते करतात. पण झटपट पैसा कमाविण्याची इच्छा धरणारे अशी धोक्याची काम करू शकत नसल्याने त्यांनी अश्लील छायाचित्रांचा आधार घेत धमकाविण्यास सुरुवात केली आहे.
पोपट यादव, पोलीस निरीक्षक, मलबार हिल पोलीस ठाणे</p>