सातबारा उताऱ्यावरील नांवे हक्क सोडपत्राच्या आधारे कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच कोतवाल शामराव रामू हेगडे (वय ५५ रा.एमेकोंड, ता.आजरा) यांच्याकडून स्वीकारताना वाटंगीच्या तलाठी श्रीमती विजू भिकाजी भोसले (वय ४० रा.जोशी गल्ली आजरा, मूळ गाव कोरोची, ता.हातकणंगले) यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार केरेबीन मोती नोरेंज (रा.मोरेवाडी, पो.वाटंगी) यांचे वडील मोती रूजाय नोरेंज मयत आहेत. वडील हयात असतांना केरेबीन नोरेंज यांनी व त्यांचा भाऊ अंतोन यांचे नावे जमीन गट नं.१२६१ मधील९ एकरापैकी तीन-तीन एकर जमीन वाटणीपत्राद्वारे आपल्या नावे करून घेतली आहे. उर्वरित तीन एकर जमीन केरेबीन नोरेंज यांची आई व तीन बहिणी यांच्या नावे करण्यासाठी हक्कसोडपत्र तयार करून दिले होते. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून नांवे कमी करण्यासाठी तलाठी श्रीमती भोसले यांनी दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना श्रीमती भोसले यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Story img Loader