‘बोलक्या पुस्तका’च्या माध्यमातून अनेकवेळा ऐकलेला आवाज ‘त्यांनी’ कानात साठवून साठवून ठेवला आहे. पण या आवाजाची आजवर कधी भेट झालेली नाही. या भेटीचा योग जुळून आला आहे. ही भेट प्रत्यक्ष होणार असली तरी ‘त्या’ आवाजाचा चेहरा ‘त्यांना’ पाहायला मिळणार नाही. कारण ती मंडळी अंध आहेत. अर्थात असे असले तरी कानात साठवलेल्या आवाजाशी आपल्याला प्रत्यक्ष बोलता येणार असल्याचे समाधान आणि आनंद त्यांना आहे..
निमित्त आहे ते नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड अर्थात ‘नॅब’च्या ‘टॉकिंग बुक सेंटर’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमाचे. ‘नॅब’तर्फे अंध व्यक्तींसाठी ‘बोलकी पुस्तके’ तयार केली जातात. संस्थने आत्तापर्यंत सुमारे सात हजार बोलकी पुस्तके तयार केली असून मराठीतील सुमारे तीन हजार पुस्तकांचा यात समावेश आहे.
या बोलक्या पुस्तकांचा राज्यभरातील हजारो अंध व्यक्ती लाभ घेतात. ‘बोलकी पुस्तके’तयार करण्यासाठी अनेकांनी आवाज दिला आहे. म्हणजेच त्या पुस्तकाचे वाचन केले आहे. ‘नॅब’च्या टॉकिंग बुक सेंटरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने आवाज देणारे कलाकार आणि वाचक यांचा मेळावा येत्या १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘नॅब’चे मानद सचिव आणि ‘टॉकिंग बुक सेंटर’चे अध्यक्ष जोकिम रापोझ यांनी दिली. दिवंगत डॉ. आर. टी व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने १९६३ मध्ये या उपक्रमास सुरुवात झाली होती. दृष्टिहिनांसाठी फक्त आवाजाच्या माध्यमातून त्या साहित्यातील सर्व रस आणिमानवी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. ते मोठे आव्हान असते. ‘नॅब’च्या पुस्तकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी आवाज दिला आहे. ही पुस्तके ‘ऐकणारे’ अंध वाचक आणि पुस्तक वाचणारी व्यक्ती यांच्यात एक अनोखे नाते तयार झाले आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने या बोलक्या कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम दुपारी २ वाजता ‘नॅब’च्या मुख्य कार्यालयात (खान अब्दूल गफार खान मार्ग, वरळी, सीफेस) होणार आहे. या कार्यक्रमास पुस्तकांचे वाचन करणारे अनिल कीर, श्वेता पंडय़ा, एडनवाला, फ्रेनी गगराट, गांधी तसेच सुमारे २०० अंध वाचक उपस्थित राहणार आहेत.
‘बोलकी पुस्तके’ ‘वाचणारे’ व ‘ऐकणारे’ यांची होणार हृद्य भेट!
‘बोलक्या पुस्तका’च्या माध्यमातून अनेकवेळा ऐकलेला आवाज ‘त्यांनी’ कानात साठवून साठवून ठेवला आहे. पण या आवाजाची आजवर कधी भेट झालेली नाही. या भेटीचा योग जुळून आला आहे. ही भेट प्रत्यक्ष होणार असली तरी ‘त्या’ आवाजाचा चेहरा ‘त्यांना’ पाहायला मिळणार नाही.
आणखी वाचा
First published on: 16-02-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking books readers and listeners will meet