पुणे मेट्रो प्रकल्पाची शहरात भरपूर चर्चा सुरू असली आणि मेट्रोसाठी आता दिल्लीत बैठक होणार असली, तरी विकास आराखडय़ात मात्र मेट्रो सव्र्हिस स्टेशनसाठी जी दोन आरक्षणे आवश्यक होती ती दर्शविण्यात आलेली नाहीत, अशी तक्रार करण्यात आली आहे. कोथरूड कचरा डेपो आणि शेतकी महाविद्यालय येथे मेट्रो स्टेशन व मेट्रो हब प्रस्तावित असला, तरी त्याचे आरक्षण मात्र आराखडय़ात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना महापालिका प्रशासनाने मेट्रोच्या प्रकल्प अहवालात ज्या जागा मेट्रो सव्र्हिस स्टेशन म्हणून निश्चित केल्या आहेत, त्या जागांवर आरक्षण दर्शविणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने तसे आरक्षण आराखडय़ात दर्शविलेले नाही, तसेच सोमवारी जो आराखडा मुख्य सभेत मंजूर करण्यात आला त्या सभेतही आरक्षण दर्शविण्यासाठी कोणतीही उपसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे मेट्रोच्या सव्र्हिस स्टेशनला जागाच उपलब्ध नसल्याची हरकत पुणे जनहित आघाडीने घेतली आहे.
केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुणे मेट्रोसाठी गुरुवारी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. मात्र, या बैठकीत मेट्रोसाठी चर्चा होणार असली, तरी मेट्रो स्टेशनसाठी जागा कोठे आहे असा प्रश्न जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले, की कोथरूड कचरा डेपो येथील अठ्ठावीस एकर आणि शेतकी महाविद्यालयाची साठ एकर एवढी जागा मेट्रोसाठी आवश्यक असल्याचे मेट्रो अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, विकास आराखडय़ात या जागेवर अद्याप मेट्रोचे आरक्षण दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने व पक्षनेत्यांनी मेट्रोसाठीची चर्चा आणि बैठक करण्यापूर्वी मेट्रोसाठी आरक्षण का नाही, याचा खुलासा करावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा