सायकल रिक्षा चालवून गुजराण करणाऱ्या माणसाची आपल्या मुलीला शिकवण्यासाठीची धडपड, म्हणजे ‘तानी’! दिग्दर्शक संजीव कोलते यांनी या चित्रपटाचा तोल सुंदर सांभाळला आहे. त्यामुळे ‘तानी’ पाहणे एक सुखदच नाही, तर रोमहर्षक अनुभव ठरतो..
संघर्ष हा नाटय़ाचा आत्मा असतो, असं म्हणतात. दोन नात्यांमधील किंवा दोन गोष्टींमधील संघर्ष पाहणं पूर्वीपासूनच प्रेक्षकांना आवडत आलं आहे. मग तो संघर्ष परिस्थितीशी असेल, तर त्या संघर्षांतून धडाही घेतला जातो. आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही अशा संघर्षांवर आधारित चित्रपटांनी वाहवा मिळवली आहे. अगदी त्या तोडीचा नसला, तरी एक उत्तम संघर्ष तानी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विदर्भातील नागपूरजवळच्या गावात राहणाऱ्या शंकरचा (अरुण नलावडे) भाऊ आत्महत्या करतो. त्यानंतर त्याची वहिनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला घराबाहेर काढते. कामाच्या शोधात शंकर नागपूरला येतो आणि आपल्या मेव्हण्याच्या मदतीने सायकल रिक्षा चालवायला लागतो. त्याची बायको गिरिजा (वत्सला पोलकमवार) चार घरची कामेही स्वीकारते. दरम्यान, शंकरची मधली मुलगी तानी (केतकी माटेगांवकर) हिला शिकायची खूप इच्छा असते आणि शंकरही तिला शिकवण्याच्या जिद्दीने झपाटल्यागत कामाला लागतो. तानीही घरची आघाडी, शाळेतल्या मैत्रिणींचे आणि घरकामाच्या ठिकाणी मालकिणीचे टोमणे वगैरे सांभाळून अभ्यासाला लागते. तिला यश मिळते का, तिच्या या वाटचालीत काय काय विघ्ने येतात, तिच्या कुटुंबाला काय गमवावे लागते वगैरे सगळ्याच गोष्टी अनुभवण्यासाठी ‘तानी’ पाहाच!
चित्रपटभर खूप छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून संजीव कोलते यांनी आपला ठसा उमटवला आहे. गायत्री कोलते यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात त्यांनी कथेलाही न्याय दिला आहे. ‘मला पुन्हा शिकायचे आहे,’ असे तानी सांगते तेव्हा चित्रचौकटीत सायकल रिक्षेमागे लिहिलेले ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हे वाक्य दिसते. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या शेवटी तानीच्या आयुष्यात ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा असलेला शंकर सगळ्यांपेक्षा उंचीवर उभा दाखवला आहे, हादेखील खास दिग्दर्शकीय टच्!
या चित्रपटात पात्रांची वेशभूषा आणि रंगभूषा सगळ्यांनाच साजेशी आहे. अरुण नलावडे यांचा ‘वाघ’ तर शंभर नंबरी आहे. गळ्यात घुंगरू घातलेल्या बैलांची गाडी दूर गेली तरी घुंगरांचा आवाज कानात वाजत राहतो, त्याचप्रमाणे चित्रपटातील वऱ्हाडी बोली गुंजत राहते. ऐकायला खूप गोड वाटते. वऱ्हाडी अघळपघळपणा प्रेक्षकाला आपलंसं करतो.
चित्रीकरणात दिग्दर्शकाने फार क्लृप्त्या न करता साध्या सोप्या टेकिंगवर भर दिला आहे. तसेच प्रकाशयोजनाही परिणामकारक आहे.
चित्रपटात मध्यंतरानंतर तानी आणि तिच्या मुख्याध्यापकांचा मुलगा या दोघांचे एक द्वंद्वगीत आहे. या गीताची काहीच गरज नव्हती. या दोघांच्याही नात्याला पुढे काहीच टोक नाही. त्यामुळे ते नाते ध्वनित होण्याचीही गरज नव्हती. त्याचप्रमाणे कलेक्टरीण झालेली तानी साकारण्यासाठी एखाद्या प्रौढ अभिनेत्रीला घेतले असते, तर ते परिणामकारक ठरले असते. चित्रपटातील गाणी चांगली जमली आहेत. मात्र सुरुवातीच्या संगीताचा एक तुकडा फार पूर्वीच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘कान्हा आन मिलो, आन मिलो श्याम सावरे’ या गाण्याची याद देतो. संगीतकार प्रवीण कुवर यांनी दिलेले संगीत प्रसंगानुरूप आहे.
अभिनयाच्या बाबतीत अरुण नलावडे आणि वत्सला पोलकमवार या दोघांच्या भक्कम भूमिकांपुढे आणि अभिनयापुढे तानीची भूमिका करणारी केतकी माटेगांवकर झाकोळली आहे. अरुण नलावडे यांना अनेक वर्षांनी एवढी सशक्त आणि भक्कम भूमिका मिळाली आहे.
त्यांनीही अक्षरश: घाम आणि रक्त गाळून त्या भूमिकेचं सोनं केलं आहे. वत्सला पोलकमवार यांनी तर निव्वळ बहार उडवून दिली आहे. भावजयीने घराबाहेर काढल्यानंतर संतापलेली आणि अगतिक झालेली पत्नी, तीन मुलांना वाढवताना मेटाकुटीला आलेली आई, कष्ट उपसण्याची मानसिक तयारी असतानाही शरीर साथ देत नसल्याने तिची होणारी कुचंबणा या सगळ्याच गोष्टी त्यांनी खूप उत्तम साकारल्या आहेत. केतकी माटेगांवकरनेही काम चांगले केले आहे. मात्र तिचा अभिनय अजून प्रगल्भ होण्याची गरज आहे. असे चित्रपट नक्कीच तिला त्या दिशेने घेऊन जातील.
तानीच्या शाळेतील मुख्याध्यापकाचे काम करणारे डॉ. विलास उजवणे, तानीचा मानलेला मामा सुखदेव याची भूमिका करणारे देवेंद्र दोडके यांनीही आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत.हा चित्रपट किमान एकदा तरी जरूर बघावा, असाच आहे. अशा चांगल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्थान न मिळणे, हे मराठी चित्रपटसृष्टीचे दुर्दैव म्हणावे लागेल.
तानी
निर्माते – वंदना पतके ठाकूर, अजय ठाकूर, कथा – गायत्री कोलते, पटकथा-संवाद-दिग्दर्शन – संजीव कोलते, संगीत – प्रवीण कुवर, कलावंत – केतकी माटेगांवकर, अरुण नलावडे, वत्सला पोलकमवार, डॉ. विलास उजवणे, देवेंद्र दोडके