कर्जत तालुक्यातील बंद केलेल्या जनांवराच्या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात व मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात यासाठी तालुक्यातील अनेक सरपंचांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शिवसेनेचे गुलाब तनपुरे यांनी या मागणीचे नेतृत्व केले. तालुक्यात या वर्षी भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. पर्जन्यमान ५० टक्क्य़ापेक्षा कमी आहे. तरीही थोडय़ा पावसावर अनेक छावण्या बंद करण्यात आल्या. जनावरांना आज कोठेही चारा उपलब्ध नाही. तालुक्यातील बेलगाव, घुमरी, चिंचोली रमजान, मांदळी, कोभंळी, खांडवी, चांदे बुद्रक, वालवड, मुळेवाडी या भागात अतिशय भयानक परिस्थिती आहे.
रब्बी हंगामाने ओढ दिल्याने ज्वारीचे पीकही वाया गेले आहे. सिंचनाची कोणतीही योजना या भागात नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई निर्माण झाली आहे. या भयानक परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रमजान चिंचोली व मांदळी येथे छावण्यांना मान्यता तर मिळालीच नाही उलट महसूल अधिकाऱ्यांनी चुकीच अहवाल पाठवल्याने अनेक छावण्या बंद करण्यात आल्या.
आणखी सात ते आठ महिन्यांचा काळ जायचा आहे व आताच ही परिस्थिती आहे. त्यामुळे बंद झालेल्या छावण्यांना तत्काळ परवानगी देऊन त्या सुरू कराव्यात, अन्यथा दि. २२ला नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी रास्ता रोको करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर गुलाबराव तनपुरे, संपतराव बावडकर, प्रवीण तापकीर, विजय पवार, वसंत अनभुले, शिवाजीराव गाढवे, हरी बाबर, गुलाब बाबर, हौसराच गांगर्डे, राजू शिंदे, शरद गांगर्डे, संपत गांगर्डे, अरूण लामटुळे, विनोद राऊत, महेश काळे आदींच्या सह्य़ा आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा