अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. दुपारी नागमठाण येथे ६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. नांदूर मधमेश्वरमधून १३ हजार ५८७ क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावले. येत्या दोन दिवसांत जायकवाडीत लक्षणीय वाढ होईल.
सकाळी ८ वाजता जायकवाडीत ३.९२ टक्के पाण्याची वाढ झाली. विभागातील अन्य धरणांमध्ये अजूनही पाण्याची स्थिती समाधानकारक नाही. उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड जिल्ह्य़ांत टँकरचा मुक्काम वाढला आहे. औरंगाबादेत २०० पेक्षा अधिक टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तीव्र दुष्काळानंतर धरणांमध्ये पाणीसाठा होण्याइतपत पाऊस अजूनही झाला नाही. पिकांसाठी आवश्यक पाऊस मात्र सर्वत्र पडला. मूर पावसाने पिकांची वाढ जोमात आहे. माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीना कोळेगाव ही धरणे शून्य टक्क्य़ातच आहेत. सिद्धेश्वर धरण ८४.६१ टक्के, येलदरी ३३.०३, पेनगंगा ८७.९६, मनार ३७.७५, विष्णुपुरी ९२.३० टक्के.
औरंगाबाद जिल्ह्य़ात रिमझिम सुरू असली, तरी वरच्या भागातील धरणांमध्ये पाणीसाठा होतो की नाही, या बाबत मोठी उत्सुकता आहे. नगर व नाशिक जिल्ह्य़ांत चांगला पाऊस झाला, तरच जायकवाडी जलाशयात चांगले पाणी येते. आनंदाची बाब म्हणजे नाशिक व नगर जिल्ह्य़ांतील धरणांच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू झाल्याने दारणा धरणासह नांदूर मधमेश्वरमधून वेगाने नवीन पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे.
मशागतीची ओढ अन् पावसाची झड
वार्ताहर, लातूर
आंतरमशागतीची कामे लवकर उरकण्याची शेतकऱ्याला ओढ असली, तरी पावसाच्या झडीचा त्यात अडथळा निर्माण होत आहे. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या झडीमुळे मशागतीची कामे खोळंबली आहेत.
जुलतील ३१ पकी तब्बल २२ दिवस पावसाने हजेरी लावली. उर्वरित ८ दिवस पावसाने दांडी मारली असली, तरी ही सुटी सलग नसल्यामुळे मशागतीची कामे चांगलीच खोळंबली. पावसाने उघडीप दिल्यानंतर कोळपणी, खुरपणीची कामे करण्यात शेतकरी गुंतला होता. या वर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळे पिके तरारली असली, तरी शेतातील तणामुळे शेतकरी बेजार आहेत. गेल्या चार वर्षांपासून खुरपणीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा वापर करीत असून, या वर्षी तणनाशकाचा वापर ५० टक्क्य़ांच्या आसपास झाला आहे. दहा तालुक्यांत केवळ तणनाशकाची खरेदी १५ कोटींच्या आसपास झाली आहे. हेक्टरी किमान १० हजार रुपये खुरपणीस शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. तणनाशकाच्या वापरामुळे हा खर्च निम्म्यावर आला.
शेतकऱ्याची तणनाशकाची मागणी लक्षात घेऊन विविध कंपन्यांची उत्पादने वाढली असून आता त्यासाठीही शेतकऱ्याला अधिक पसे खर्चण्याची वेळ आली आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला; पण मशागतीची कामे करता न आल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
जालन्यात ६२ टक्के
वार्ताहर, जालना
शहरासह जिल्ह्य़ाच्या बहुतेक भागात दमदार पाऊस झाला. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्य़ात सरासरी ४२५ मिमी पावसाची नोंद झाली. या काळातील अपेक्षित पावसापेक्षा तो अधिक आहे. जिल्ह्य़ातील आतापर्यंतच्या पावसाची तालुकानिहाय नोंद मिमीमध्ये – जालना ५०७.१, भोकरदन ३६८.३५, जाफराबाद ५२२.६, बदनापूर ३१३.६, परतूर ५२२.६, अंबड ३८१.८२, घनसावंगी २५९.८८ व मंठा ५२४. मागील वर्षी जिल्ह्य़ात ३१ जुलैपर्यंत सरासरी १३८.८ मिमी एवढात पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा ४२५ मिमी असा चांगला पाऊस झाला. जूनमध्ये सर्वाधिक पाऊस जाफराबाद तालुक्यात होता. प्रारंभी कमी प्रमाण असणाऱ्या मंठा तालुक्यात मागील १०-१२ दिवसांत जोरदार पाऊस झाला. मंठा तालुक्याने जून व जुलैमधील सर्वाधिक पावसाचा म्हणून बाजी मारली. जिल्ह्य़ातील आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३७ टक्के, तर एकूण वार्षिक अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास ६२ टक्के आहे.
हिंगोली ८० टक्क्य़ांवर
वार्ताहर, हिंगोली
पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्य़ात पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्य़ात आतापर्यंत ८०.२३ टक्के पावसाची नोंद झाली. इसापूर धरणाच्या दोन दरवाजांतून ८७.५९८ क्युसेकने पेनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चालू आहे.
जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली. गत २४ तासांत पडलेल्या पावसाची सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये, कंसात एकूण सरासरी पाऊस – हिंगोली १६.२८ (७३८.८४), वसमत २०.७१ (६४३.७३), कळमनुरी १५.६६ (६५३.०३), औंढा नागनाथ २८ (८४०.६२), सेनगाव २० (६५९.८), एकूण ३५३५.२८. ज्याची सरासरी ७०७.०६ इतकी असून त्याची टक्केवारी ८०.२३ आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३६.७२ टक्के नोंद होती.
इसापूर धरणातून दोन दरवाजांद्वारे ८७.५९८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीत सुरू आहे. धरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवक वाढल्यास किंवा पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यास सांडव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्य़ात २६ पैकी २५ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
बीडमध्ये पुन्हा रिपरिप
वार्ताहर, बीड
चार दिवसांच्या उघडपीनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली असून, जिल्हय़ातील सहा तालुक्यांत दिवसभर पावसाची टिपटिप होती. इतर ठिकाणी मात्र तुरळक स्वरूपात पाऊस झाला. दिवसभरात सरासरी ३ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत ३५० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हय़ात जुलच्या मध्यानंतर पावसाची रिमझिम सातत्याने चालू राहिली. चार दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र पिकांच्या मशागतीची लगबग दिसून आली. पावसाळी वातावरण व रिपरिप पाऊस असला तरी नद्या, नाल्यांना अजूनही पाणी आले नाही. पाणीसाठाही वाढला नाही. अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, केज व परळी तालुक्यांत चांगला पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांत पावसाचा जोर कमीच आहे. आतापर्यंत वार्षकि सरासरीच्या ३५० मिमी पावसाची नोंद झाली.
विष्णुपुरी प्रकल्प काठोकाठ
वार्ताहर, नांदेड
जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा ६३२.१७ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या १६ तालुक्यांत कमी-अधिक पावसाची संततधार सुरू होती.
नांदेड शहरातल्या पिरबुऱ्हाणनगर, श्रावस्तीनगर, दत्तवाडी, लालवाडी, प्रभातनगर, श्रीनगर, निजाम कॉलनी, उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या वसंतनगर आदी भागातल्या अनेक घरांत पाणीच पाणी झाले होते. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात ढालेगाव, झरी, गंगाखेड आदी भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पातळीतही वाढ झाली. सायंकाळी पाचपर्यंत विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला. पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिमीमध्ये – नांदेड ३२.७५, मुदखेड २८, अर्धापूर २३.३३, भोकर ५३.७५, उमरी ३७.३३, कंधार ३०, लोहा २३, किनवट ४४.७१, माहूर ३५.५०, हदगाव ३८, देगलूर २५.६७, बिलोली ३०, धर्माबाद ३१, नायगाव ३१.४०, मुखेड २८.४३. जिल्ह्यात गत २४ तासांत सकाळी आठपर्यंत ४२.३४. मिमी पावसाची नोंद झाली.
औरंगाबादसह तीन जिल्ह्य़ांत टँकरचा मुक्काम कायम
अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे.
First published on: 01-08-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker stay continue in three district with aurangabad