जिल्हा मूल्यमापन समिती गावातील तंटामुक्त गाव समितीची आणि ग्रामस्थांची बैठक घेते. मोहीम कालावधीत केलेल्या कामांची माहिती त्यांच्याकडून घेवून स्वयंमूल्यमापन अहवाल, नोंदवह्या व अभिलेख तपासले जातात. सर्व प्रकारच्या दाखल तंटय़ांची तसेच नव्याने निर्माण झालेल्या तंटय़ांची माहिती संकलीत करून त्यांच्या नोंदी त्या त्या विषयाच्या नोंदवहीत समितीने केल्या आहेत की नाही, याची खातरजमा केली जाते.
तंटामुक्त गाव समितीने तयार केलेला स्वयंमूल्यमापन अहवाल शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार तपासला जातो. चारही प्रकारच्या मिटविलेल्या तंटय़ातील किमान प्रत्येकी दोन तंटय़ातील वादी व प्रतिवादी यांच्याशी संपर्क साधून तंटा मिटल्याची खात्री करण्यात येते. तंटामुक्त गाव समितीने विहित निकषानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा मूल्यमापन समिती अनेक मुद्यांचा विचार करते. त्या अंतर्गत तंटामुक्त गाव समितीने नोंदवही क्रमांक एक, परिशिष्ट सहा व त्यासोबत सादर केलेली पूरक माहितीची तपासणी, तंटामुक्त गाव समितीशी चर्चा करून केलेल्या उपाययोजनांची माहिती घेणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना अथवा उपउपाययोजनांची कार्यवाही करण्याची जबाबदारी ज्यांनी पार पाडली, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती घेणे, गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विविध मंडळे, महिला मंडळे, महिला बचत गट, इतर संस्था यांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांच्याशी चर्चा करून माहिती घेणे यांचा समावेश आहे.
जिल्हा मूल्यमापन समिती शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार तंटे मिटविले गेले आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत याची खात्री करून गुणदान करते. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार दिले जाणार असल्यामुळे मूल्यमापन समिती २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या योग्य असल्याचीही खात्री करते आणि त्याचा उल्लेख मूल्यमापन अहवालात केला जातो. या पद्धतीने प्रत्येक गावाच्या कामकाजाची सखोल पडताळणी केली जात असल्याचे लक्षात येते.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील सदोतीसावा लेख.

Story img Loader