गाव पातळीवर दाखल असणारे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नाशिक परिक्षेत्रात नंदुरबार हा जिल्हा सामोपचाराने तंटे सोडविण्यात आघाडीवर राहिल्याचे लक्षात येते. या प्रक्रियेत परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नाशिक जिल्हे मात्र तुलनेत पिछाडीवर आहेत.
राज्य शासनाच्या पुढाकारातून १५ ऑगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेंतर्गत गावात सामाजिक व राजकीय सामंजस्य टिकविणे आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या उद्देशाने कामकाजास सुरूवात झाली. सातव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रातील ५४ तालुक्यातील चार हजार ८६१ गावे सहभागी झाली आहेत.
मोहिमेच्या कामकाजात गावांनी सक्रिय सहभाग घ्यावा, याकरिता तंटामुक्त गांव समिती, जिल्हा सल्लागार व अंमलबजावणी समिती, जिल्हा कार्यकारी समिती, तालुकास्तरीय समिती, पोलीण ठाणे, जिल्हा मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात आली. या शिवाय, जातीय सलोखा राहावा, जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटवणे व नव्याने निर्माण झालेले तंटे मिटवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
गावातील तंटे सामोपचाराने मिटवणे हा महत्वपूर्ण भाग. त्यात नंदुरबार आघाडीवर असल्याचे लक्षात येते. २००७-२००८ मध्ये नंदुरबारमध्ये ५४६९ तंटे दाखल झाले. त्यातील ६६ टक्के म्हणजेच तीन हजार ६१८ तंटे सामोपचाराने सोडविण्यात यश मिळाले. त्या पुढील वर्षांत दाखल असलेल्या २९२६ पैकी १०७२ तंटे सोडविण्यात आले. म्हणजे ३७ टक्के तंटे समितीने सोडविले. २००९-१० वर्षांत हे प्रमाण २९.३७ टक्के झाले. दाखल झालेल्या ३४०५ पैकी १००० तंटे सामोपचाराने सोडविण्यात आले. २०१०-११ मध्ये ही टक्केवारी पुन्हा काही अंशी घसरली. नंदुरबार जिल्ह्यात ३१४९ तंटे दाखल असताना केवळ ८८३ तंटे सामोपचाराने सोडविले गेले.
तंटे सोडविण्याची ही टक्केवारी २८ टक्के होती. मोहिमेच्या २०११-१२ वर्षांत ३,२२६ तंटे दाखल झाले. त्यातील १३५५ तंटे सोडविण्यात आले. तंटे सोडविण्याचे हे प्रमाण ४२ टक्के आहे. परिक्षेत्रातील इतर जिल्ह्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास नंदुरबार जिल्हा तंटे सोडविण्यात आघाडीवर असल्याचे लक्षात येते.

 

Story img Loader