* मूलभूत सुविधाही दुर्लक्षित  
* पर्यटक व भाविकांमध्ये नाराजी
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी महापालिकेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या दृष्टीने राजकीय मंडळींकडून शहर विकासाच्या गप्पांना ऊत आला असतांना कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या पंचवटीतील ‘तपोवन’ ची सध्याची अवस्था पाहता तपोवन खरोखरच अजूनही वनातच आहे की काय, असे वाटावे. कुंभमेळा आटोपल्यानंतर तपोवनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची स्थानिक प्रशासनाची वृत्तीच त्यासाठी कारणीभूत आहे. मोठय़ा उत्साहाने तपोवनात येणाऱ्या दूरदूरच्या पर्यटकांना येथे आल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत आहे. कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पंचवटीतील तपोवनाचे धार्मिकदृष्टय़ा अधिक महत्व. पौराणिक काळात राम, लक्ष्मण आणि सीतेचे वास्तव्य येथे होते, असे रामायणात म्हटले आहे. या ठिकाणी कपिला आणि गोदा या दोन नद्यांचा संगम झाला असल्याने बाहेरगावहून अनेक पर्यटक हा संगम पाहण्यासाठी येतात. परिसरात अनेक देवतांची मंदिरे आहेत. यामुळे तपोवनात आल्यावर गोदा स्नानासह देवदर्शनाचा लाभ आणि शिवाय शहरापासून दूर असल्याने निरव शांतता, या काही वैशिष्टय़ांमुळे पर्यटकांसह शहरातील नागरिक तपोवनाकडे वळत असतात. कुंभमेळ्यात तर तपोवन देश-विदेशातील साधू संतांच्या गर्दीने फुलून जाते. काही दिवसांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाच्या अनास्थेमुळे अगणित समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तपोवनात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात शहर बससेवा नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांना खासगी वाहन व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. यामुळे बऱ्याचदा खासगी वाहनचालकांकडून भाविक व पर्यटकांची फसवणूक व लूटमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी किंवा पोलिसांचा राबता नसल्याने भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. तपोवनाची नेमकी माहिती पर्यटकांना होण्यासाठी पालिकेच्या वतीने मंदिर आवारात काही नामनिर्देश फलक लावण्यात आले आहेत.
इतरत्र मात्र अशा माहिती फलकांची वानवा असल्याने बाहेरील पर्यटकांना आपण नेमके काय पाहतो, कुठे चाललो हेच कळत नाही.
गोदा-कपिला संगम स्थान आता जणूकाही ‘धोबीघाट’ झाला आहे. या शिवाय पात्रात सर्रासपणे सांडपाणी मिसळले जात असल्याने अनेकदा येथे फेसाळयुक्त पाणी पहावयास मिळते. या रसायनमिश्रीत पाण्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. त्याचा त्रासिक भाव पर्यटकांच्या चेहऱ्यावर सहजपणे वाचता येतो. नदीकाठी शेवाळयुक्त पाण्याचे डबके ठिकठिकाणी साचलेले दिसते.
या ठिकाणी असणारा गोलाकार पूल मोडकळीस आला असून पर्यटकांच्या सहनशीलतेची परीक्षाच तो घेतो. पुलावरील बांबु ठिकठिकाणी मोडल्याने बाजूच्या लोखंडी दांडय़ाचा आधार घेतल्याशिवाय पर्यटकांना पर्याय नसतो. पुलाचे अग्निदिव्य पार केल्यानंतर भाविकांना येथे नेमके काय पहावे असा प्रश्न सतावत असतांना समोर राम-लक्ष्मण-सीता यांचे लोखंडी शिल्प त्यांना खुणावते.
या शिल्पापर्यंत पोहचण्यासाठी खाचखळगे पार करावे लागतात. शिल्पास नमस्कार करणारे भाविक मागील बाजूचे दृश्य पाहून मात्र नाराज होऊन लगेच परततात. शिल्पावर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून ठेवली आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याचा हा परिणाम आहे.
कुंभमेळा जसजसा जवळ येईल, त्याप्रमाणे ही परिस्थितीही बदलत जाईल. परंतु कायमस्वरूपी अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध होत नसल्याने थेट बारा वर्षांनंतरच  या परिसराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते.
सुविधा का नाही देत ?
मी  मुलांना येथील संस्कृती पाहण्यासाठी घेऊन आलो. पण येथील दृश्य भयावह आहे. संगमाच्या ठिकाणी अस्वस्छता, पाण्यामध्ये पडलेल्या बाटल्या हे पाहून मुलांना नेमके काय दाखवावे असा प्रश्न पडला. आज मंदिरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर देणगी स्वरूपात पैसा जमा होत असतांना एवढय़ा पैशांचे काय होते ? त्यातून सोयीसुविधा का केल्या जात नाहीत ?
मनोज शर्मा, अनिवासी भारतीय
शिल्प पाहून दु:ख वाटले
तिलकसिंग यादव यांनी सांगितले, तपोवनात पहिल्यांदा आलो.
मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारावर इथे येण्यात अडचण नाही आली. पण राम, लक्ष्मण सिता यांच्या शिल्पाची अवस्था पाहून मनाला क्लेश झाला.
तिलकसिंग यादव, भाविक

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?