मार्चपर्यंत कोणतीही यंत्रसामग्री न हलविता राज्य सहकारी बँकेला शुक्रवापर्यंत (उद्यापर्यंत) तासगाव कारखान्याचा ताबा देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गणपती जिल्हा संघाला दिला आहे. पण यामुळे  कामगारांनी आपल्या ९ कोटी देण्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. गणपती जिल्हा संघाने गोदामात ठेवलेली साखर उचलण्यास न्यायालयाने दोन महिन्याची मुदत दिली असली तरी ९ कोटीच्या देण्यासाठी कामगार वर्ग आक्रमक झाला आहे.
राज्य सहकारी बँक उद्या तासगाव साखर कारखान्याचा ताबा घेणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. मात्र कामगारांच्या ९ कोटींच्या थकीत देण्यावरून कामगार वर्ग आक्रमक बनला आहे. गणपती संघाने कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय साखरेचे एकही पोते बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशारा तासगाव कारखान्याच्या कामगारांनी दिला आहे. त्यामुळे तासगाव कारखान्यावरून उद्या संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
 सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि पलूस तालुक्याच्या सीमेवर तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना आहे. माजी आमदार दिनकर आबा पाटील यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. मात्र गेल्या १० वर्षांच्या काळात तासगावच्या या नावलौकिक मिळवलेल्या कारखान्याला आíथक अडचणीला सामोरे जावे लागले. या कारखान्यावर तब्बल दीडशे कोटींचे कर्ज झाल्याने कारखाना आजारी पडला.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तासगाव साखर कारखाना हा चालवायला देण्याची वेळ आली. मागील सहा वर्षांपासून सांगलीच्या गणपती संघाकडे हा कारखाना आहे. या गणपती संघाने कारखाना चालविला, मात्र कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षांची कामगारांची ९ कोटींची थकीत देणी अद्यापि गणपती संघाकडून येणी आहे. यामध्ये हक्काची रजा,ग्रॅज्युईटी, तसेच ६ वर्षांचा फरक संघाकडून दिला गेलेला नाही. यासाठी कामगारांनी गेल्या दोन महिन्यापासून मागणी रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. न्यायालयाने  कारखान्यातील शिल्लक साखर उचलण्यास गणपती संघाला परवानगी दिली आहे. तसेच कारखान्याच्या मूळ यंत्रसामग्रीपकी काही साहित्य व यंत्र सामुग्री आढळली नाही तर ती संघाने जमा करायची आहे. गणपती संघाने नवीन यंत्रसामग्री बसविली असेल तर त्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या तज्ज्ञांमार्फत मूल्यांकन करावे आणि राज्य बँक व संघाने याबाबतचा सामंजस्याने प्रश्न मिटवावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
भाडेतत्त्वाच्या कालावधीतील कामगारांची देणी,ऊस बिले, शासकीय देणी, गणपती संघाने द्यावीत, असे न्यायालयाने म्हटले असल्याने कामगार वर्ग ९ कोटींच्या थकबाकीसाठी आक्रमक झाला आहे. गणपती संघाने थकीत देणी दिल्या शिवाय साखरेच्या पोत्याला हात लावू न देण्याचा इशारा देत कामगारांनी आज कारखान्यासमोरच ठिय्या मारीत निदर्शने केली.त्यामुळे तासगाव कारखान्यावरून उद्या संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.