कल्याण-डोंबिवली परिसरातून ‘टाटा’च्या उच्च दाबाच्या वीज वाहक वाहिन्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरी वस्तीत या वीज वाहिन्यांचे मनोरे आहेत. या मनोऱ्यांचा वापर काही ठिकाणी उत्सवाच्या व्यासपीठाचा एक भाग, आधार म्हणून करण्यात येतो. उच्च दाब वाहिनीतील बिघाडामुळे सण, उत्सव साजरे करण्याच्या ठिकाणी काही अपघात झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या वेळी येणारी जबाबदारी कोणाची असा प्रश्न करत टाटा वीज वाहिन्यांच्या मनोऱ्यांखाली गणपती, नवरात्रोत्सव साजरा करण्यास मंडळांना परवानगी देऊ नये अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
मागील काही वर्षांपासून या भागातील स्थानिक रहिवासी पोलीस ठाण्यात सार्वजनिक रस्त्यांवर, तसेच उच्च वीज वाहिनीच्या अवतीभोवती आयोजित करण्यात येणाऱ्या गणपती तसेच नवरात्रोत्सवाबाबत तक्रारी करीत आहेत. मात्र, पोलीस ठाण्यातून त्याची दखल घेण्यात येत नाही. डोंबिवलीत कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील टाटाच्या उच्च दाबाच्या वीज वाहक वाहिन्यांखाली दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
सकाळ ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा आवाज सुरू असतो. दर्शनासाठी नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते. उच्च दाब वाहिनीत काही बिघाड झाल्यास अपघात या भागात होऊ शकतो. याची कल्पना पोलिसांना असूनही पोलीस या उत्सवाला परवानगी देतात कशी असे प्रश्न या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील जेवढय़ा उच्च वीज दाब वाहिन्या आहेत. त्या खाली व परिसरात उत्सव साजरे करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा