आजचा तरुण सुक्षिशित आहे. तरीही उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या केवळ २० टक्केच्या आसपास आहे. सुमारे ८० टक्क्यांहून अधिक तरुण दहावी किंवा बारावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतात. उच्च शिक्षणाबद्दल तरुणांमध्ये प्रचंड अनास्था आहे, अशी खंत जेष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे व्यक्त केली.
आगरी युथ फोरमच्या वतीने डोंबिवलीच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आगरी महोत्सव सुरू असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तात्याराव लहाने यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतकार विद्याधर रिसबूड यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी लहाने यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी उपस्थितांसमोर खुली केली.
लहाने म्हणाले, शिक्षण नसल्याने पुढे नोकरी मिळत नाही. कोणत्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करायचा याचे मार्गदर्शन घेतले जात नसल्याने निवडलेल्या क्षेत्रात अपयश येण्याची देखील शक्यता असते. पर्यायाने नैराश्य येऊन तरुण आत्महत्येच्या, व्यसनांच्या गर्तेत सापडतो आहे. जीवनात अभ्यास, कामाविषयी आस्था नसेल तर डोळ्यासमोर कामय अंधारी येत राहील, असे खडे बोल डॉ.लहाने यांनी आजच्या वाट चुकलेल्या तरुणाईला सुनावले.
आजची तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. सिगारेट, तंबाखू, दारू या गोष्टी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. या प्रतिष्ठेच्या गोष्टी आपल्या आयुष्यात नसतील तर आयुष्याचे वाटोळे होते, अशी काहीशी गैरसमजूत तरुण पिढीत वाढू लागली आहे. अशा खोटय़ा प्रतिष्ठा सोडल्या पाहिजे असे बोल त्यांनी सुनावले.
जगातील ४२ देशांमधून रुग्ण उपचारांसाठी आपल्याकडे येत असतात. इस्त्रायलमध्ये शिक्षण घेऊन आल्याने शस्त्रक्रियेच्या तंत्रज्ञानामध्ये योग्य ते बदल करणे शक्य झाले असून रुग्णांसाठी ते सोयीचे ठरते. जे.जे. रुग्णालयात डोळ्यांच्या विभागाचा नावलौकिक वाढला आहे.
अनेक असाध्य आजार घेऊन रुग्ण येथे उपचाराला येतात. त्यांच्यावर येथे उपचारदेखील तात्काळ केले जातात. सरकारची मदतदेखील आहे. मात्र सरकारच्या धोरणानुसार वागणे आवश्यक असते. त्यामुळे काही शस्त्रक्रिया मोफत असतात, तर काही मोफत करणे शक्य होत नाहीत, असे तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कायम…
डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून शनिवारी अनेक मान्यवर कलाकार डोंबिवलीकरांच्या भेटीस येत आहेत. मराठी दिग्दर्शक रवि जाधव आणि त्यांच्या टाइमपास या चित्रपटाचे कलाकार, वैभव मांगले, प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम, अभिनेता प्रथमेश, प्रथम आणि वाट बघतोय रिक्षावाला फेम गायिका रेश्मा सोनावणे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर झी मराठीच्या सुगंधा लोणीकर, विश्वास पाटील यांची मुलाखत रविप्रकाश कुलकर्णी घेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा