जकात दरवाढीच्या ठळक बाबी सर्व जीवनावश्यक वस्तू, धान्ये, डाळी, खाद्यतेले, सायकल, रिक्षांसह सर्व वाहने, साखर, गूळ, रॉकेल, लोखंड, पोलाद, सर्व प्रकारची यंत्रसामग्री तसेच स्टिलची भांडी.
मिळकत करात सरसकट सहा टक्के वाढ केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंच्या जकात दरातही वाढ करण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीने सोमवारी बहुमताने घेतला. या दरवाढीला काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने विरोध केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने करवाढीला पाठिंबा दिला. या निर्णयामुळे दोन-चार वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंची जकात १ एप्रिलपासून वाढणार असून वस्तूंच्या दरातही वाढ होणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंच्या जकात दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. समितीच्या खास सभेत सोमवारी त्याला मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव चर्चेसाठी आल्यानंतर जकातीच्या दरात वाढ न करता  सर्व वस्तूंचे दर चालू वर्षांप्रमाणेच ठेवावेत, अशी उपसूचना देण्यात आली. या उपसूचनेवर मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादी व मनसेच्या मिळून आठ सदस्यांनी उपसूचनेच्या विरोधात मतदान केले, तर काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी तीन आणि शिवसेनेचा एक अशा सात सदस्यांनी बाजूने मतदान केले. त्यामुळे आठ विरुद्ध सात अशा मतांनी उपसूचना फेटाळण्यात आली आणि जकात दरवाढीचा मूळ प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आगामी वर्षांत महापालिकेला ११० कोटींचे वाढीव उत्पन्न मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सर्व वस्तू महागणार
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्ये यासह सर्व प्रकारची धान्य, खाद्यतेले, सर्व प्रकारची पिठे, गूळ, चिंच, कडबा, गवत आदी अनेक वस्तूंवर आतापर्यंत जकात माफ होती. त्याऐवजी ती आता या सर्व वस्तूंसाठी १० किलोला २० पैसे अशा दराने आकारली जाईल. सर्व प्रकारच्या डाळी तसेच डाळींची पिठे यांनाही जकात माफ होती. ती आता १० किलोला ५० पैसे अशी करण्यात आली
आहे.
पुढील सर्व वस्तूंच्या किमतीवरील जकात किमतीवर शेकडा या पद्धतीने आकारली जाणार आहे. साखर, खसखस यावरील जकात शेकडा पाच वरून सहा टक्के करण्यात आली आहे. तसेच केरोसिन, सर्व प्रकारची तेले, औषधे यावरील जकात एक वरून दोन टक्के करण्यात आली आहे. सायकली, रिक्षा तसेच सर्व प्रकारच्या वाहनांवरील जकात दोनवरून तीन टक्के करण्यात आली आहे. तर सर्व प्रकारची कमावलेली कातडी, धागे, लोकर, बियाणे तसेच कागदावरील जकातही दोनवरून शेकडा तीन टक्के करण्यात आली आहे.
अखाद्य तेलांवरील जकात शेकडा अडीच टक्के होती. ती आता तीन टक्के करण्यात आली आहे. लोखंड, पोलाद, स्टिलची भांडी, पत्रे, जर्मनची भांडी, तांब्याची भांडी यांच्यावरील जकातही अडीचवरून तीन टक्के करण्यात आली आहे. सर्व प्रकारची यंत्रसामग्री तसेच यंत्रसामग्रीचे सुटे भाग यावरील जकात शेकडा किमतीवर तीनवरून साडेतीन टक्के करण्यात आली आहे, तर डांबरावरील जकात तीनवरून चार टक्के करण्यात आली आहे. वनौषधी, चंदन, केशर यांची जकातही तीनवरून चार टक्के करण्यात आली आहे.
सातत्याने होत असलेली दरवाढ लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलवरील जकात माफ करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, त्यावरील जकात सध्याच्याच दोन टक्के दराने आकारावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. चहा, कॉफी आणि शेतीची अवजारे यांना जकात माफी द्यावी, अशी उपसूचना स्थायी समितीत देण्यात आली आणि ती संमत करण्यात आली. तसेच स्वयंपाकाच्या गॅसवर जकात माफ असून ती माफी कायम ठेवण्यात आली आहे.