हकीम समितीच्या शिफारशींनुसार गेल्या ११ ऑक्टोबरपासून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांवर ३०-३५ टक्क्यांची रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ लादण्यात आली. ही भाडेवाढ करताना सर्व रिक्षा आणि टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर लावली जातील आणि मग रिक्षाचालकांकडून केली जाणारी फसवाफसवी थांबेल, असे एक ‘स्वप्न’ परिवहन खात्यातर्फे दाखविण्यात आले होते. परंतु भाडेवाढ तर झालीच; वर इलेक्ट्रॉनिक मीटर रिक्षापेक्षा वेगात पळत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. संतापजनक बाब म्हणजे मीटर जास्त रक्कम दाखवत असल्याचे रिक्षाचालकांच्या निदर्शनास आणून दिले असता, ‘आरटीओनेच हे मीटर लावले आहे. आम्ही मीटरनुसारच पैसे घेणार!’ असे उद्दामपणे सांगितले जात आहे. रिक्षा कुठेही न थांबताही १५०० मीटर अंतर कापायच्या आधीच १६ अथवा १७ रुपये पडणे, रात्री ११.५० वाजताच मीटरमध्ये १२ वाजल्याचे दर्शवणे, किंचितशा वाहतूक कोंडीतही ‘वेटिंग चार्ज’ भराभरा वाढणे अशा अनेक तक्रारी उपनगरांमधून येऊ लागल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक मीटर लावल्यानंतर तमाम रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक मीटर आरटीओने संमती दिल्यानंतरच लावण्यात आल्याने आता त्यात जो आकडा येईल तेवढे पैसे आम्ही घेणारच!’ ही भूमिका. बहुतांश रिक्षाचालक मीटरबाबत कोणतीही तक्रार ऐकूनच घेत नाहीत.
* जानेवारीमध्ये प्रस्तुत प्रतिनिधीला सकाळी ११.३० च्या सुमारास कांदिवली (प.) रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या साईबाबा नगर येथे रिक्षाने जाताना (क्रमांक एमएच-०२-टीए-२१४७) मीटरवर १४०० मीटरचा आकडा असतानाच प्रथम १६ रुपये आणि लगेच १७ रुपये झाल्याचे दिसले. अखेर १७०० मीटर जाऊन रिक्षा थांबल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटर २० रुपये दाखवित होते. रिक्षा वाटेत कुठेही थांबलेली नव्हती. मात्र रिक्षाचालक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अतिशय उद्दामपणे त्याने पोलिसाकडेही येणार नाही, असे सांगितले.
* दुसऱ्या प्रसंगात गोरेगाव स्थानक (पूर्व) येथून वीरवाणी इंटस्ट्रियल इस्टेट येथे जाऊन परत यायचे असे सांगून एकजण रिक्षात (क्रमांक एम एच- ०२- यूए- ८३२८) बसला. याही वेळी रिक्षा वीरवाणी इंटस्ट्रीजवळ क्षणभर थांबून परत फिरली. मात्र १४०० मीटर अंतर कापतानाच १६ रुपये आणि १८०० मीटरला रिक्षा थांबली असताना २१ रुपये झाले. रिक्षाचालक प्रमोदकुमार दुबे याने अगतिकता दर्शवत, ‘क्या करे, साब मीटर तो आरटीओने लगाया है’ असे सांगितले. अर्थात त्याने घेतले फक्त २० रुपये.
* १ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५० वाजता एका रिक्षामध्ये (क्रमांक एमएच-०२ -व्हीए -२७५३) मीटर टाकल्यानंतर थेट १९ रुपये दिसू लागले. चालकाला अजून १२ वाजलेले नाही असे सांगितले असता ‘वो मुझे मालूम नही, आप को मीटर के हिसाब से ही पैसा देना पडेगा।’ असे सुनावले.
या तिन्ही प्रकारांमध्ये एक साम्य होते. ते म्हणजे यातील एकाही चालकाने ओळखपत्र गळ्यात घातलेले नव्हते. भाडेवाढ अंमलात आल्या दिवसापासून हक्काने जास्तीचे पैसे वसूल करणारे रिक्षाचालक, त्यांच्या अरे‘रावी’ संघटना आणि जणू त्यांच्याच भल्यासाठी काम करणारे परिवहन खाते भाडेवाढीसोबतचे ‘प्रवाशांच्या सुविधांचे पॅकेज’ लागू करताना गाढ झोपी गेल्याचे दिसून येत आहे.
रिक्षांची मीटर वेगात धावत असतानाच सिग्नलला थांबल्यानंतर तर ते अधिकच वेगाने धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. वेटिंग चार्ज हे प्रवाशांसाठी एक गौडबंगाल झाले आहे. मुख्य म्हणजे आता रिक्षाचालक (युनियनच्या निर्देशांनुसार) प्रवाशांचे काहीही ऐकूनच घेत नाहीत. ‘पोलिसांकडे जाऊन तक्रार करा’ असा उद्दाम पवित्रा ते खुशाल घेऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा