शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्षयाची बाधा होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांबाबत पूर्णपणे बेपर्वा असल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे.
पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशा संरक्षक उपायांअभावी क्षयरोगाची लागण होते. नुकताच येथील एक्स-रे टेक्निशिअन रमेश जाधव (५६) यांचा मृत्यू ओढवला. रुग्णांच्या छातीचे एक्स-रे काढण्याचे काम करणाऱ्या जाधव यांना सतत रुग्णांच्या संपर्कात आल्याने टीबीची लागण झाल्याचा संशय होता. गेल्या वर्षी त्यांना टीबी झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत या रुग्णालयातील ३५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला असून, त्यापैकी चालू वर्षांच्या ९ महिन्यांत जाधव यांच्याशिवाय अशोक कांबळे व रवींद्र सोनवणे हे वॉर्डबॉय आणि स्वीपर अशोक सोळंकी असे ४ कर्मचारी मरण पावले आहेत. टीबीग्रस्त झालेल्यांपैकी सगळ्यात जास्त २७ चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून, ८ परिचारिका, १ डॉक्टर व १ लिपिक यांचाही त्यात समावेश आहे. यामुळे कर्मऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
कामगारांसाठी संरक्षक उपायांची काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी केला. क्षयरोग रुग्णालयातील समस्यांबाबत आम्ही अनेक आंदोलने केली, परंतु प्रशासन निष्क्रियच राहिले. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केईएमसह अनेक रुग्णालयांना भेट दिली. परंतु टीबी हॉस्पिटलमध्ये मात्र संसर्गाच्या भीतीमुळे ते न फिरता कार्यालयातच बसून राहिले. क्षयाची लागण झाल्यामुळे ३७ कर्मचारी रजेवर आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांना दिला जातो तसा ‘रिस्क अलाऊन्स’ येथील कामगारांनाही देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
रुग्णांच्या संपर्कात राहून कर्मचारी क्षयाने मरण पावत असले, तरी महापालिकेचे प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. अनेकांचा मृत्यू ओढवूनही प्रशासनाला जाग येत नाही. रुग्णालयाचा परिसर अतिशय अस्वच्छ असल्यामुळे रुग्ण बरे होत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरता आठ दिवसांत बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मा केसकर यांनी दिले होते, पण महिना उलटूनही ही बैठक झालेली नाही. टीबीची लागण होत असल्यामुळे कर्मचारी येथे यायला तयार होत नाहीत, असे सेना कामगार युनियनचे सुनील चिटणीस यांनी सांगितले.
क्षयरोग रुग्णालयातील कर्मचारी मृत्युच्या सावटाखाली
शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्षयाची बाधा होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
First published on: 25-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tb hospital staff live under shadow of death