क्षयरोग हा आतापर्यंत गरिबांना होणारा आजार मानला जात होता. परंतु, क्षयरोगाच्या ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ (टीबी-एमडीआर) या प्रकाराने हा समज खोडून काढला आहे. भारतात या प्रकारच्या क्षयरोगाचे ६६ हजाराहून अधिक रुग्ण असल्याचा दावा करून जागतिक आरोग्य संघटनेने खळबळ उडवून दिली होती. आता मुंबईत टीबी-एमडीआरला बळी पडलेल्या एका १९ वर्षांच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांमुळे या आजाराचे गांभीर्य पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. शहरातील खासगी रुग्णालयातील क्षयरोग्यांची माहिती मागवून या आजाराची पाळेमुळे शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिका सक्रीय झाली आहे.
याला निमित्त झाले ते श्रीराम राधाकृष्णन या आयआयटीत शिकणाऱ्या एका तरूण, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे. श्रीराम सीबीएसईच्या २०११च्या बारावीच्या परीक्षेत तब्बल ९७.६ टक्क्य़ांची कमाई करत राज्यातून पहिला आला होता. सुरुवातीपासूनच त्याचे स्वप्न वडिलांप्रमाणे आयआयटीत शिकण्याचे होते. त्याचे वडील आर. राधाकृष्णन आयआयटीत प्राध्यापक आहेत. श्रीरामनेही आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईईत चांगल्या गुणांची कमाई करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली होती. या मेहनतीचे चीज जेईईत २२४वा क्रमांक पटकावून झाल्यानंतर त्याचा मुंबईच्या आयआयटीतील प्रवेश निश्चित झाला. मात्र, २०११च्या जुलैमध्ये टीबीचे निदान झाल्यामुळे त्याला वर्गात एकदाही हजेरी लावता आली नाही.
वर्गात हजेरी लावता येणे शक्य नसल्याने आयआयटीने श्रीरामला दोन वर्षांचा ‘ब्रेक’ घेण्याचीही मुभा दिली. श्रीरामवर माटुंग्याच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. ऑगस्टमध्ये त्यांच्या मेंदूपर्यंत टीबीने मजल मारली. मार्चमध्ये तो बेशुद्धावस्थेत गेला. परंतु, या अवस्थेतही त्याची श्वसनयंत्रणा सुरू होती. काही वेळा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तो संपूर्णपणे कधीच बरा झाला नाही. अखेर याच आठवडय़ात त्याचे प्राणोत्क्रमण झाले.
हा आजार नावाप्रमाणेच औषधांना दाद देत नसला तरी त्याचे वेळीच निदान होऊन उपचार सुरू झाल्यास तो आटोक्यात येऊ शकतो. मात्र, श्रीरामच्या प्रकरणात या आजाराचे निदान होण्यासच बराच वेळ लागल्याने त्याला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. एमडीआरच्या रुग्णांवर क्षयरोगाच्या सामान्य उपचारांचा (डॉट्स) परिणाम होत नाही. या आजाराची तीव्रता लक्षात घेत केंद्र सरकारने या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने टीबी-एमडीआरवर मात करण्यासाठी योजलेल्या उपायांमुळे राज्यातील अन्य जिल्ह्य़ांबरोबरच देशभरातून या प्रकारच्या रुग्णांचा ओघ पालिकेच्या रुग्णालयात येऊ लागला आहे. आजच्या घडीला पालिकेकडे टीबी-एमडीआरच्या १६०० रुग्णांची नोंद आहे. ‘एमडीआर रुग्णाच्या औषधोपचारांवरील खर्च अडीच ते पाच लाखांच्या घरात असल्याने मध्यमवर्गीय रुग्णही उपचारांसाठी पालिकेच्या रुग्णांलयाकडे वळू लागले आहेत. यात देशभरातून रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात येत असतात. म्हणून मुंबईतील एमडीआर रुग्णांची संख्या वाढताना दिसते,’ असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. एम. क्षेत्रपाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ही वाढती मागणी लक्षात घेऊन पालिका रुग्णालयातील टीबीच्या रुग्णांसाठी असलेली बेडची क्षमताही २६ वरून १५० वर नेण्यात आली आहे.
‘टीबी-एमडीआर’ने त्याचा घात केला!
क्षयरोग हा आतापर्यंत गरिबांना होणारा आजार मानला जात होता. परंतु, क्षयरोगाच्या ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ (टीबी-एमडीआर) या प्रकाराने हा समज खोडून काढला आहे. भारतात या प्रकारच्या क्षयरोगाचे ६६ हजाराहून अधिक रुग्ण असल्याचा दावा करून जागतिक आरोग्य संघटनेने खळबळ उडवून दिली होती. आता मुंबईत टीबी-एमडीआरला बळी पडलेल्या एका १९ वर्षांच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांमुळे या आजाराचे गांभीर्य पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. शहरातील खासगी रुग्णालयातील क्षयरोग्यांची माहिती मागवून या आजाराची पाळेमुळे शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिका सक्रीय झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-12-2012 at 11:59 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tb mdr had frod him