राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपाने सेलू (काटे) येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
शाळेतील १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव विवेक कार्लेकर असून तो अंशकालीन संगणक शिक्षक होता. रविवारीच या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्य डॉ.आशा मिरगे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अकोला येथील नवोदय विद्यालयातील शारीरिक शोषणाचे प्रकरण ताजे असतांनाच सेलू (काटे) येथील नवोदय विद्यालयातील घडलेल्या प्रकाराने मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे विभागीय प्रशासन हादरून गेले आहे. पीडित मुलगी गत दीड वर्षांंपासून या शाळेत शिकत होती. जानेवारीत तिच्या वागण्या-बोलण्यात फ रक दिसून आल्याने तिच्यावर कुटुंबीयांनी उपचार केले. एप्रिलमध्ये छेडछाडीची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली होती, असे स्पष्ट करीत डॉ. मिरगे यांनी नमूद केले की, त्याची दखल घेऊन महिला आयोगाने चौकशी केली.
या मुलीशी चर्चा केल्यावर आरोपीने डिसेंबरमध्ये एकाच दिवशी दोन वेळा आपले लैंिग शोषण केल्याचे तिने रडत रडत नमूद केले. तिची आपबिती ऐकून सगळे थक्क झाले.
विद्यालयात शिक्षणाऱ्या मुलीचे पालकत्व प्राचार्य व शिक्षकांवरच असते. ते याबाबत अनभिज्ञ असण्याची बाब अनाकलनीय असून हा सुध्दा एक अपराधच आहे, असे डॉ. मिरगे यांनी स्पष्ट केले, तर प्राचार्य आर. नागभूषण म्हणाले की, पीडित मुलीच्या तक्रारीवरून यापूर्वी या शिक्षकास निलंबित केले होते. मुलीने प्राचार्याकडे तक्रार न करता थेट पोलिसांकडे धाव घेतली होती, असेही ते म्हणाले. या प्रकरणात शाळा व्यवस्थापनावर संशयाची सुई वळली आहे. शाळेच्या वास्तव्यात मुलीची बदललेली वागणूक पाहून प्राचार्य, अधीक्षक, शिक्षिका, परिचारिका व अन्य संबंधित व्यक्तींनी तिची विचारपूस करणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे आरोपी शिक्षकास यापैकी कुणाचा पाठिंबा मिळत होता काय, अशी शंका व्यक्त करीत महिला आयोगाने त्या दृष्टीने कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना भेटून केली आहे.
महिला आयोगाच्या आजच्या भेटीच्या वेळी महिला व बालकल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे, नवोदय प्रशासनाचे विभागीय सहआयुक्त पी.व्ही.एन.राजू, अधीक्षक मेघा जोशी, उपप्राचार्य अश्विनी कोलार उपस्थित होते. आरोपी शिक्षकास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा