श्रीगोंदे शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या लहान मुलाला गैरसमजातून शिक्षकाने अमानुष मारहाण केली. हे प्रकरण आता थेट पोलीस ठाण्यात गेले असून मुलाच्या पालकांनी या शिक्षकाविरूद्ध तक्रार दिली आहे. राज्यात नव्याने लागू झालेल्या कायद्यानुसार येथेच पहिली कारवाई होते काय, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इयत्ता सातवीतील ऋत्विक शिंदे या विद्यार्थ्यांला गावित (पूर्ण नाव समजू शकले नाही) या शिक्षकाने चांगलीच मारहाण केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी शाळेत काही विद्यार्थ्यांचे आपसात भांडण झाले. त्यावरून वर्ग सुरू असताना इयत्ता सातवीच्या वर्गात येऊन या शिक्षकाने ऋत्विकला लाकडी छडीने चांगलेच बदडले. अंगावर वळ उमटेपर्यंत हा प्रकार सुरू होता. वास्तविक ऋत्विकचा वर्गाबाहेरील ‘त्या’ मारामारीशी काहीही संबंध नव्हता, त्यात शिंदे आडनावाचा दुसराच विद्यार्थी सहभागी होता. मात्र, ऋत्विकलाच ‘तो’ शिंदे समजून या शिक्षकाने बेदम मारहाण केली. ऋत्विकच्या पालकांना ही गोष्ट समजल्यानंतर मात्र गोंधळ उडाला. त्याच्या पालकांनी थेट पोलीस ठाण्यामध्येच या शिक्षकाविरूध्द तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. नव्या शिक्षण धोरणातील याबाबतच्या नव्या कायद्यानुसार आता काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. रितसर गुन्हा दाखल झाला तर या कायद्यानुसार कारवाई होणारा हा राज्यातील पहिलाच गुन्हा ठरेल.   

Story img Loader