एका अपात्र शिक्षकाकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा प्रकार भिवंडीतील एका शाळेत दोन वर्षांपूर्वी घडला असून याप्रकरणी शिक्षण विभागाने चौकशीअंती संबंधितांना दोषी ठरवूनही थातूरमातूर कारवाईने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भिवंडीच्या नारपोली विभागातील श्रीराम हिंदी हायस्कूलमध्ये दोन वर्षांपूर्वी (मार्च- २०१२) हा प्रकार घडला आहे. शाळेच्या माध्यमिक विभागाचे तत्कालीन मुख्याध्यापक प्रवीण सूर्यराव यांच्या नावे इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या २५० उत्तरपत्रिका बोर्डाकडून तपासण्यासाठी आल्या होत्या. तसे पत्रही सूर्यराव यांना आले होते. मात्र तत्पूर्वी शाळा व्यवस्थापनाने सूर्यराव यांना शाळेच्या सेवेतून निलंबित केले. मर्जीतल्या मुख्याध्यापकाची नेमणूक करायची असल्याने व्यवस्थापनाने मला निलंबित केले, असा सूर्यराव यांचा दावा आहे. शाळा व्यवस्थापन आणि सूर्यराव यांच्यातील वाद आता कामगार लवादापर्यंत गेला आहे. व्यवस्थापन आणि माझ्यात वाद असला तरी शाळेने दहावीच्या उत्तरपत्रिका किमान पात्र शिक्षकाकडून तपासून घेणे गरजेचे होते, असे सूर्यराव यांचे म्हणणे आहे. मात्र तसे न करता शाळेने सहावीच्या वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकाकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बी.एड. असणे आवश्यक असते. शाळेने उत्तरपत्रिका तपासून घेतलेले सहावीचे शिक्षक आलोक सिंह डी.एड. आहेत. मात्र ही गंभीर बाब घडल्याचे चौकशीत निष्पन्न होऊनही केवळ संबंधित शिक्षकाचे मानधन जप्त करण्यापलीकडे शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रवीण सूर्यराव यांनी पुन्हा दाद मागितली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे.    

Story img Loader