गुरू-शिष्य परंपरेचे नाते उलगडणारा आणि त्यांच्या गायकीचा अनुभव देणारा दोन दिवसांचा संगीत महोत्सव नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. वसंतराव देशपांडे संगीत सभेने आयोजित केलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक व अभिनेते पं. चंद्रकांत लिमये, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. राम देशपांडे, पद्मा तळवलकर आणि त्यांचे शिष्य सहभागी झाले होते.संगीत सभेचा पंधरावा वर्धापन दिन आणि दिवंगत ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने झालेल्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. लिमये यांनी बिहाग रागातील ‘ओ मा धन धजरी’ हा विलंबित एकतालातील ख्याल, त्याची द्रुत तीनतालातील ‘ना छेडो, ना छेडो’ ही बंदिश गायली आणि वातावरण भारून टाकले. मध्यमातील ‘िबदिया ले गयी’ हा दादरा सादर केल्यानंतर रसिकांच्या खास आग्रहास्तव ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील ‘छेडियल्या तारा’ हे नाटय़पद गायले. पं. लिमये यांचे शिष्य स्वानंद भुसारी, सुनील पंडित यांनी गायनात, तर ओंकार मुळे, सीमा ताडे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.पं. चौरसिया यांनी चंद्रकंस रागात आलाप, जोड आणि झाला वाजविले. रुपक तालात मध्य लयीतील बंदिश व द्रुत तीनतालातील जोड सादर केली.दरबारी रागातील ‘झनक झनक मोहे बिछुवा’ या प्रसिद्ध बंदिशीची धून व नंतर दादऱ्यातील आणखी एक धून सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे शिष्य विवेक सोनार यांनी बासरीवर, तर पं. विजय घाटे यांनी तबला साथ केली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पं. राम देशपांडे यांनी भैरव रागातील विलंबित तीलवाडामध्ये ‘तोरी बारी खुली रही’ हा पारंपरिक ख्याल, तीनतालात तराणा, बंदिश गायली. भटियार रागातील स्वरचित बंदिश ‘गगनराज आयो है’ आणि तीनतालातील ‘तू करतार’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. गंधार देशपांडे व आदित्य मोडक या शिष्यांनी त्यांना गायनात साथ दिली. पं. लिमये आणि देशपांडे यांना अतुल ताडे (तबला), सुधांशु घारपुरे (हार्मोनियम) यांनी संगीत साथ केली. पद्मा तळवलकर आणि त्यांच्या शिष्या यशस्वी सरपोतदार यांनी बिलावलमध्ये विलंबित एकतालातील ‘कथा मोरे’, तीनतालात ‘जा रे जा कगवा’ ही बंदिश, जौनपुरी रागातील ‘धूम धनधन’ सादर केली. रंगलेल्या मैफलीची सांगता त्यांनी ‘संत कान्होपात्रा’ नाटकातील ‘अगा वैकुंठीच्या राया’ या अभंगाने केली. यती भागवत (तबला) व सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम), गोविंद भिलारे (पखवाज) यांनी त्यांना संगीतसाथ केली.

Story img Loader