सहावी आर्थिक गणना करण्यासाठी सोमवारी येथे आयोजित प्रशिक्षण वर्गावर महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकला. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांना या कामास मनाई केली आहे. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून कोणीही शिक्षकांनी यापुढील प्रशिक्षणास उपस्थित राहू नये, असे आवाहन महापालिका शिक्षक समन्वय समितीने केले आहे.
सहावी आर्थिक गणना २०१३-१४ या काळात राबविली जात आहे. हे काम करण्यासाठी १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहे. परंतु, संबंधित काम हे अशैणिक असून बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार जनगणना, आपत्ती व्यवस्थापन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम देऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देस आहेत. तरीदेखील हे काम शिक्षकांना दिले जात असल्याकडे नाशिक महापालिका प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने लक्ष वेधले. मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्षकांना हे काम देण्यास मनाई केली आहे. या पाश्र्वभूमीवर, समन्वय समितीच्या बैठकीत आर्थिक गणनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी सोमवारी महाकवी कालिदास कला मंदिरात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला सर्वानी प्रतिसाद देऊन या कामावर बहिष्कार टाकला. त्या बाबतचे निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यापुढील आर्थिक गणनेच्या होणाऱ्या प्रशिक्षण वर्ग आणि कामकाजावर महानगरपालिका शिक्षकांच्या संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुढील प्रशिक्षणास शिक्षकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन जिभाऊ अहिरे, बाळासाहेब कडलग आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा