मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व इतर थकीत देयके त्वरित मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन आंदोलकांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शाळांना सुटी लागून महिनाभराचा कालावधी लोटला आहे. या काळात शिक्षण विभागाने शिक्षकांकडून निवडणूक तसेच विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणे आदी कामे करून घेतली. एकीकडे कामाचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे शिक्षकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. मात्र शिक्षण विभागाने यासाठी कुठलाही जादा मोबदला न देता मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व इतर थकीत बिले ही शिक्षकांच्या बँक खात्यावर अद्याप जमा केलेली नाही. याबाबत विचारणा केली असता ‘ऑनलाइन’ वेतन पद्धतीमुळे वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन महिन्यांच्या थकीत वेतनामुळे शिक्षकांनी वैयक्तिक कारणांसाठी तसेच गृह, शैक्षणिक कामांसाठी काढलेले कर्जाचे हप्ते रखडले आहेत. जादा व्याजदराचा भरुदड अनेकांवर पडला असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.
भविष्य निर्वाह वेतन पथक कार्यालयाकडे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची वैद्यकीय बिले, फरक बिले, पुरवणी बिले तसेच भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे परतावा, ना परतावा असे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. तरी काही प्रकरणे ज्येष्ठता यादी डावलून गैरमार्गाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अशी कुठली प्रकरणे मंजूर केली आहे याची चौकशी विभागाच्या वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांनी करावी, त्याची माहिती संघटनेला द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. या सर्व कारभाराचा निषेध म्हणून सोमवारपासून बेमुदत घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनात प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम रकीबे, सखाराम जाधव आदी पदाधिकारी, सदस्य सहभागी होते.

Story img Loader