महाराष्ट्र राज्य कनिष्ठ शिक्षक महासंघाच्या निर्णयानुसार राज्यभर सुरू असणाऱ्या ‘सरकार जगावो’ आंदोलनांतर्गत गुरुवारी ‘ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी सकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. लवकरच या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढील महिन्यात होणाऱ्या १२वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
१ जानेवारी १९९६पासून सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करणे, सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी आणि ग्रेड-पे देण्यात यावा, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत जमा करणे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करणे, २०१२-१३ शैक्षणिक वर्षांत नियुक्त शिक्षकांना त्वरित मान्यता देणे आणि माहिती, तंत्रज्ञान, ज्ञानविषयाचे शिक्षक यांना त्वरित वेतन आणि मान्यता द्यावी अशा अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी ‘ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
यामधील काही मागण्या मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे एका शिक्षकाने सांगितले. यावेळी जिल्ह्य़ाच्या विविध महाविद्यालयांतील १५०हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.