मुंबईतील अनेक शिक्षकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. शाळेतील कामाचा किंवा शिकविण्याचा ताण हे त्याचे कारण नसून प्राप्तिकर विभागाकडून आलेल्या नोटिसांमुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. मुंबईतील बहुतांश शिक्षकांना गेल्या महिन्याभरात प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा आल्या असून त्याद्वारे शिक्षकांना प्राप्तिकर भरण्यास सांगितले जात आहे. पण हा प्राप्तिकर शिक्षकांच्या पगारातून कापला गेला असल्याने तो पुन्हा का भरायचा, असा प्रश्न अनेक शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
२०११-१२ या आर्थिक वर्षांसाठीचा प्राप्तिकर अद्याप भरलेला नसून तो त्वरित भरावा, अन्यथा प्राप्तिकर कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई होईल, असे प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. एका शिक्षकाला तर १७ हजार रुपये प्राप्तिकर आणि चार हजार रुपये व्याज असे मिळून २१ हजार रुपये त्वरित भरण्याची नोटीस आली आहे. पण प्रत्यक्षात या शिक्षकाच्या पगारातून ही रक्कम यापूर्वीच कापून घेण्यात आली आहे. असाच प्रकार अनेक शिक्षकांच्या बाबतीत झाला आहे.
दरवर्षी साधारणत: जानेवारी महिन्यापासून शिक्षकांचा प्राप्तिकर कापण्यास सुरुवात होते. यासंदर्भात शाळा किती कर कापावा याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकारी कार्यालय आणि ‘पे अँड अकाऊंट’ विभागाला देत असते. यानुसार कर कापून त्यांना पगार देण्यात येतो. याबाबत शिक्षकांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पत्रही मिळते. असे सर्व असतानाही शिक्षकांना प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या नोटिसा प्राप्तिकर विभागाच्या बंगळुरू येथील कार्यालयातून आल्या आहेत.
आमच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर भरूनही अशा नोटिसा आल्यामुळे आम्हाला मनस्ताप होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पे अँड अकाऊंट विभाग आणि प्राप्तिकर विभाग यांनी समन्वय साधून योग्य तो तोडगा काढावा, यामध्ये शिक्षकांना आणू नये अशी मागणी शिक्षक परिषदचे शिवनाथ दरडे यांनी केली आहे. शिक्षकांनी या संदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधला तर आम्ही प्राप्तिकर कापला असून नोटिसा कशा आल्या हे आम्हाला माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तर पे अँड अकाऊंट विभागाकडूनही आमच्या सव्‍‌र्हरवर या संदर्भातील माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याची माहितीही दरडे यांनी दिली.

Story img Loader