शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यापूर्वी संबंधित शिक्षकाने शिजवलेली खिचडी आधी स्वत: खावी. नंतर अध्र्या तासाने विद्यार्थ्यांना खाऊ घालावी. खिचडीचा नमुना दुसऱ्या दिवसापर्यंत जपून ठेवावा, असा फतवाच पोषण आहार यंत्रणेने काढला आहे.
बिहारमध्ये शालेय पोषण आहारातून विषबाधेने २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील पोषण आहाराची यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये अचानक भेटी देऊन खिचडीची तपासणी केली जाऊ लागली आहे. शालेय पोषण आहाराचे अधीक्षक ढाकणे यांनी खिचडीच्या दर्जाची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
शाळेमधून वितरित केल्या जाणाऱ्या खिचडीच्या गुणवत्तेची जबाबदारी मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखालील शालेय व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे. शालेय पोषण आहाराचे अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांनी तसे आदेश काढले आहेत. दररोज विद्यार्थ्यांना खिचडी वाटपापूर्वी संबंधित शिक्षकाने शिजवलेली खिचडी अगोदर खावी. त्यानंतर अध्र्या तासाने विद्यार्थ्यांना ती खाऊ घालावी. शिजवलेल्या खिचडीचा नमुना दुसऱ्या दिवसापर्यंत जपून ठेवावा, असेही समितीला बजावले आहे. खिचडी वाटप व स्वच्छतेची कामे करणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून मुख्याध्यापकांकडे तसा अहवाल द्यावा. खिचडी किचन शेडमध्येच शिजवावी. तेथील स्वच्छता योग्य प्रकारची असावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. खिचडी शिजवणे व विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याचा वापर करण्याचे आदेशही दिले आहेत.
मात्र, जिल्हय़ातील ५० टक्के गावांमध्ये आजही पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे खिचडी शिजवण्यासह विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी कुठून आणायचे, हा शिक्षकांपुढील मोठा प्रश्न आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था नेमकी काय आहे? याची माहितीही शिक्षण विभागाकडे नसल्यामुळे कागदोपत्री आम्ही आदेश काढले होते. ते दाखवण्यासाठी असे आदेश निघत आहेत. याचे पालन कसे करायचे? हा सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन समितीसमोरील मोठा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा