इतिहासापासून तर प्रचलित समाज व्यवस्थेपर्यंतच्या विषयांचा वेध येथे समता प्रतिष्ठानच्या वतीने दशकपूर्ती वर्षांनिमित्त आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेतून घेण्यात आला. तीन दिवसीय व्याख्यानमालेस येवलेकरांचा चांगला प्रतिसाद लाभला.
‘इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज’ या विषयावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी सनातन आचार-विचाराच्या इतिहासकारांनी तथाकथित संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली जो इतिहास लिहिला तो केवळ संबंधितांच्या पोटाच्या व अस्तित्वाच्या अस्मितेचा इतिहास होता, असे रोखठोक मत मांडले. इतिहासाचा विपर्यास करून कोणत्याही संस्कृती, समाज अथवा देशाचे हितरक्षण होत नसते, तर त्यासाठी खरा इतिहास जनतेला समजणे आणि त्यामध्ये त्यांचे स्वत:चे हितसंबंध संशोधन महत्त्वाचे असते. या देशात शिवकालीन परिस्थितीत जी समता, एकात्मता नांदत होती ती पुन्हा एकदा प्रस्थापित करावयाची असेल तर इथल्या बहुजनांच्या गौरवशाली इतिहासाच्या पुनर्लेखनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बहुजनांमधीलच इतिहास संशोधकांना घ्यावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांचा प्रभाव इथल्या समाजमनावर आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभर शिवाजी महाराजांचे अनेक चाहते आहेत. शिवरायांचा इतिहास मावळ्यांनी घडविला पण मावळ्यांनी लिहिला नाही. त्यामुळे इतिहास घडविणाऱ्यांनी हातात लेखणी घेऊन इतिहासाचे लेखन करणे महत्त्वाचे आहे. इतिहासाचे विकृत लेखन हे केवळ समाजातील चिमूटभर उच्चजातींचे मनोरंजन ठरते आणि त्यामुळेच बहुजनांच्या अनेक पिढय़ा बरबाद होत असतात, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन एन्झोकेम विद्यालयाचे उपप्राचार्य दत्ता महाले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून येवल्याचे नगराध्यक्ष नीलेश पटेल, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे उपस्थित होते.
प्रा. डॉ. राजन गवस यांनी ‘गावगाडा मोडून पडल्यानंतरचा महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी येवला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती राधिका कळमकर उपस्थित होत्या. आपल्या शिक्षण व्यवस्थेने पाठय़क्रमात श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष घालणे आवश्यक असताना ही महत्त्वाची गोष्ट अभ्यासक्रमातून हद्दपार झाली. यामुळे गांव- शेती- पाणी- शेण- माती या माणसाला जगण्याची ऊर्जा देणाऱ्या बाबींविषयी शिकलेली पिढी तटस्थ झाल्यामुळे आज गाव उद्ध्वस्त होत आहे.
श्रम करणाऱ्यांना दुय्यम स्थान प्राप्त झाल्यामुळे अवघा गावगाडाच मोडून पडला आहे. तो पुन्हा एकदा सावरण्याची गरज असून ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आता इथल्या सुशिक्षित पिढीला जाणीवपूर्वक घ्यावी लागणार असल्याचे प्रा. गवस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा