नवीन वर्षांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करणारे आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट आणि वार्षिक तंत्रमहोत्सवात यंदा ‘टेक्नोटेन्मेंट’च्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या वर्षी टेकफेस्टमधील टेक्नोहोलिक्समध्ये थ्रीडी मॅपिंगचा शो पाहावयास मिळणार आहे. हा शो ऑस्ट्रेलियातील ख्यातनाम थ्रीडी मॅपिंग कलावंत करणार आहेत. याचबरोबर यंदा युक्रेल येथील कलावंत संगीतमय रोषणाईचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात संगीतानुसार दिव्यांची दिशा बदलणार आहे. तर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘अरब गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमातील १२ विजेते एक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात विविध रंगांच्या एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मॉडर्न टाइम्स नावाच्या या शोमध्ये सावल्या आणि प्रकाशाचा वापर करून विविध गोष्टी सांगितल्या जाणार आहे. तसेच मानवी शरीर कोणत्याही आकारात फिरवता येऊ शकते याचा अनुभवही या शोमधून पाहावयास मिळणार आहे. तर झेक रिपब्लिक या देशातील ट्रोनी हा ग्रुप अ‍ॅक्रोबॉटिक्सचे अनोखे प्रदर्शन करणार आहे. याचबरोबर फर्स्ट प्रोजेक्ट या कार्यक्रमात एका ड्रमच्या साह्य़ाने संगीतानुभव अनुभवता येणार आहे. या ड्रमिंग ग्रुपने दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा जेतेपद पटकाविले असून चीनमधील जागतिक संगीत पुरस्कारही जिंकला आहे.
टेकफेस्टमधील ‘ओझोन’ या शीर्षकाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये यंदा सेट अप्सचे विशेष आकर्षण असणार आहे. कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी http://www.techfest.org/technoholix , http://www.techfest.org/ozone वर भेट द्या. टेकफेस्ट आयआयटी मुंबईच्या संकुलात २ ते ४ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे.

Story img Loader